*पंढरपूर निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश*

पंढरपूर:-
पंढरपूर तालुक्यात बालविवाह रोखण्यात पोलिसांच्या निर्भया पथकाला मोठे यश मिळाले आहे. दिड महिन्याच्या कालावधीत सलग तिसरा बालविवाह रोखण्यात आला असून या कारवाईची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.
दिनांक ३ मे २०२६ रोजी पंढरपूर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांना बालकल्याण समितीचे अध्यक्ष समीर सय्यद यांनी माहिती दिली की, पंढरपूर तालुका हद्दीत एक बालविवाह होणार आहे. माहिती मिळताच निर्भया पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली.
सुरुवातीला मुलीच्या नातेवाईकांनी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असल्याचे सांगितले. तसेच तिचे बारावी शिक्षण पूर्ण होऊन अनेक वर्षे झाली असल्याचेही सांगण्यात आले. मात्र निर्भया पथकाने सखोल चौकशी करत संबंधित शाळेतून बोनाफाईड प्रमाणपत्र मिळवले. त्यामध्ये मुलीचे वय १७ वर्षे ५ महिने असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत होणारा विवाह रोखला. मुलीच्या आई-वडिलांना समज देण्यात आली. तसेच अल्पवयीन मुलीला पुढील कार्यवाहीसाठी बालकल्याण समिती, सोलापूर यांच्यासमोर हजर करण्यात आले.
दरम्यान, निर्भया पथकाने पंढरपूर शहर, तालुका, ग्रामीण तसेच करकंब पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात किंवा नातेवाईकांमध्ये कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ संपर्क साधावा. संपर्क क्रमांक – ९११२२२६३५२
पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, यापुढे कोणीही बालविवाहासारखे बेकायदेशीर कृत्य केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक प्रमुख सुप्रिया यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.
बालविवाह रोखण्यासाठी पोलिसांचे हे पाऊल कौतुकास्पद मानले जात आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here