कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती.
पंढरपूर – आषाढ शुध्द एकादशीला म्हणजे दिनांक 06 जुलै रोजी आषाढी यात्रा संपन्न होत आहे. या दिवशी मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते सपत्नीक श्रींची शासकीय महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेला मोठ्या प्रमाणात वारकरी भाविकांची गर्दी असते. सदर यात्रा शांततेत व नियोजनबध्द पध्दतीने पार पाडणेकामी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने मंदिर समितीच्या कर्मचा-यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
आषाढी यात्रा 2025 निमित्त मोनिका सिंह-ठाकूर, अप्पर जिल्हाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर यांनी दिलेल्या सूचनेनुसार अग्निशमन, प्रथमोपचार, Causality Carrying Method व Safe Evacuation बाबत दि. 25 जुन रोजी श्री संत तुकाराम भवन, पंढरपूर येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये संभाजी कारले यांनी अग्निशमन तसेच बीमल नथवाणी, योगेश परदेशी व संतोष शेलार यांनी Causality Carrying Method & Safe Evacuation बाबत प्रशिक्षण व प्रात्यक्षिते दिली. यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, वसंत पिचारे अग्निशमन अधिकारी बार्शी तसेच सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
सदरचे प्रशिक्षण हे यात्रा कालावधीच्या दृष्टीने खुप उपयोगी होणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमास मंदिर समितीकडील सुमारे 250 कर्मचारी / स्वयंसेवक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्याचे यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.