दिवाळीसाठी भिमाच्या सभासदांना साखर ५किलो तर कामगारांना १० किलो मोफत सभासदांना 20 किलो सवलतीत

पंढरपूर:-


भीमा सहकारी साखर कारखाना लि., टाकळी सिकंदरच्या वतीने यंदा दिवाळीनिमित्त कारखान्याच्या सर्व सभासदांना आणि कामगारांना साखरेची गोड भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत असून, यानुसार प्रत्येक सभासदाला ३० रुपये प्रतिकिलो दराने २० किलो साखर आणि ५ किलो साखर मोफत, अशी एकूण २५ किलो साखर मिळणार आहे. तसेच कारखान्यातील कामगारांना १० किलो साखर मोफत देण्यात येणार आहे.
खा. धनंजय भिमराव महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कारखान्याचे चेअरमन विश्वराज धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.

*सभासदांसाठी साखर वाटपाचे वेळापत्रक : २ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत संबंधित गट ऑफिसवर सभासदांना साखरेचे वाटप करण्यात येणार आहे.*

*कामगारांसाठी साखर वाटपाचे वेळापत्रक : ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत कारखाना कार्यस्थळावर कामगारांना साखरेचे वाटप करण्यात येणार आहे.*

दिवाळीच्या सणानिमित्त सभासद आणि कामगारांच्या आनंदात भर घालण्याच्या उद्देशाने कारखाना व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. सभासद आणि कामगार हे कारखान्याच्या प्रगतीचे महत्त्वाचे घटक असून, त्यांच्या हिताला प्राधान्य देण्याची भूमिका कारखाना व्यवस्थापनाने घेतली आहे. या निर्णयामुळे सभासद आणि कामगारांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

*चौकट*

“भीमा सहकारी साखर कारखान्याने नेहमीच सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. यंदाही सर्व शेतकरी सभासदांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने जिल्ह्यात अत्यंत सवलतीच्या दरात २० किलो साखर आणि ५ किलो मोफत साखर देण्याचे धोरण आखले आहे. तसेच कारखान्यातील कामगारांनाही १० किलो साखर मोफत देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सभासद आणि कामगारांची दिवाळी आनंदाने व उत्साहात साजरी होईल, असा विश्वास आहे.”
— विश्वराज महाडिक चेअरमन, भीमा सहकारी साखर कारखाना लि., टाकळी सिकंदर

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here