प्रतिनिधी :-
भाजपला महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत पराभव दिसू लागला आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील सभा वाढवल्या आहेत, असा घणाघात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. पटोले आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते. सोलापुरातून प्रणिती शिंदे निवडून येतील, असा विश्वासही यावेळी पटोले यांनी बोलून दाखवला. पटोलेंनी मोदींसह अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील धारेवर धरले. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पटोले पुढे म्हणाले, भाजपाने मागील दहा वर्षांत पाप केले आहे. त्यांनी महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले. बेरोजगारांचा देश अशी आपली ओळख बनली आहे. गरिबांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. या मुद्द्यांकडे लोकांचं लक्ष जाऊ नये म्हणून आता काँग्रेसने ६० वर्षांत काय केले वगैरे म्हणत आहेत. सातत्याने हा प्रयत्न नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याकडून केला जात आहे. मोदींच्या सोलापुरातील सभेत ४०० रुपये देऊन कर्नाटकांतून लोक आणले गेले होते. तर राहुल गांधींच्या सभेत उत्स्फूर्तपणे लोक आले होते. लोक आता मोदींचं भाषण आणि त्यांचे मुद्दे ऐकून कंटाळले आहेत, असेही पटोले म्हणाले.
नरेंद्र मोदी २०१९ मध्ये सोलापुरात आले होते. तेव्हा त्यांनी लष्कराचे गणवेश शिवण्यासाठी केंद्र उभे करणार म्हणाले होते. सोलापूरमध्ये आता आले तेव्हा त्या वचनावर काहीच का बोलले नाहीत? दोन उड्डाण पुलांचा उल्लेख त्यांनी केला होता. सोलापूरचा आवाजच दिल्लीत आला नाही. २०१४ आणि २०१९ चे दोन्ही खासदार मौन राहिले. प्रणिती शिंदे या जागरुक उमेदवार आहेत, त्यांना निवडून द्या, असे आवाहन पटोले यांनी केले.
*फडणवीस आणि मी एकत्र मटण खाल्लं*
माळशिरसच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी, मी कुणाच्या वाट्याला जात नाही, कुणाला त्रासही देत नाही. पण ईश्वराची देणगीच आहे माझ्याशी विश्वासघात केला की ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही, असे म्हटले होते. याविषयावर पटोले म्हणाले की, ब्राह्मणांना शाप देण्याचा अधिकार आहे. हे आम्ही पोथी आणि पुराणांमध्ये वाचले आहे. मात्र देवेंद्र फडणवीस मटण खाणारे ब्राह्मण आहेत. त्यांचा शाप आम्हाला लागणार नाही. फडणवीस आणि मी एकत्र मटण खाल्याचा दावा देखील पटोले यांनी यावेळी केला. दरम्यान, यावेळी नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये अनेकांचा काँग्रेस प्रवेश सोहळा पार पडला.