*सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूजन करून पालखीचे प्रस्थान*
पंढरपूर, दि. २४: श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री पांडुरंगाचा पालखी सोहळा सन २०१४ पासून ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर यांच्या दिंडीसोबत श्रीक्षेत्र आळंदी येथे नेण्याची परंपरा सुरू आहे. यंदा या पालखी सोहळ्याचे तेरावे वर्ष असून, कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या पर्वावर दि. २४ नोव्हेंबर रोजी श्री पांडुरंगाचा पालखी सोहळा श्रीक्षेत्र आळंदीकडे प्रस्थान झाल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
कार्तिक शुद्ध पौर्णिमेनिमित्त आज सकाळी मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्या हस्ते श्री पांडुरंगाच्या पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रदक्षिणा मार्गावरून पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी ११ वाजता मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांच्या हस्ते पादुकांचे विधिवत पूजन करून पालखी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. या प्रसंगी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम, विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी, सहा. विभाग प्रमुख पांडूरंग दशपुत्रे तसेच पौराहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.
श्री पांडुरंगाच्या पादुकांचा हा पालखी सोहळा दि. २४ नोव्हेंबर ते दि. 1 डिसेंबर या कालावधीत श्रीक्षेत्र आळंदी येथे पोहोचणार आहे. प्रस्थानाच्या प्रवासात एकूण आठ मुक्काम असून, वाखरी, माळशिरस, बरड, सुरवडी, वाल्हे, सासवड, शिवाजीनगर (पुणे) व आळंदी असा प्रवासाचा मार्ग आहे. त्यानंतर परतीचा प्रवास दि. ९ ते १८ डिसेंबर या कालावधीत होणार असून, या प्रवासात फुरसुंगी, सासवड, वाल्हे, कोरेगाव, विडणी, मोरोची, माळशिरस, तोंडले बोंडले असे एकूण नऊ मुक्काम असणार आहेत. या पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी सोहळा संपर्कप्रमुख म्हणून मेघराज वळके-पाटील हे कामकाज पाहणार आहेत. या पालखी सोहळ्यासोबत सुमारे 6000 ते 8000 वारकरी सहभागी आहेत. पालखी सोहळ्याच्या मार्गावरील प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी तसेच सकाळच्या विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये दुपारचा नैवेद्य, दुपारचा विसावा तसेच इतर आवश्यक सुविधांचा समावेश असून, संबंधित कार्यक्षेत्रातील शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी सांगितले.



















