गेल्या पंधरा दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात ऊसदर संघर्ष समितीने ऊसाला पहिली उचल 2500 व अंतिम दर 3100 रुपये मिळावा यासाठी जिल्ह्यात आंदोलन उभारले आहे.. संघर्ष समितीचे पदाधिकारी अनेक मार्गांनी हे आंदोलन पुढे घेऊन जात असले तरी जिल्ह्यातील कोणताही साखर कारखानदार ऊसदराची कोंडी फोडण्यासाठी समोर येत नाही.. मात्र पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांनी त्यांचा ओम गूळ कारखाना 2500 रुपये दर देणार असून तोडणी नंतर अवघ्या 15 दिवसात बिल शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले जाईल असं त्यांनी जाहीर केलं आहे. उसाचं वजन कुठूनही करून आणा, मापात पाप करण्याची माझी वृत्ती नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.. गूळ कारखान्यात कोणत्याही उपपदार्थाची निर्मिती होत नाही, तरीही मला एवढा दर द्यायला परवडतो, साखर कारखानदारांकडे अनेक उपपदार्थांची निर्मिती होत आहे, त्यांना यापेक्षा जास्त दर द्यायला काहीच हरकत नाही, असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. एका गूळ कारखान्याने एवढा दर दिला असेल तर साखर कारखानदारांनीही यापेक्षा जास्त दर दिला पाहिजे अशा चर्चा आता शेतकाऱ्यांमधून सुरू झाली आहे..