- *शेतकऱ्यांच्या हितासाठी फार्मिंग एअरपोर्टची गरज : मंत्री तानाजी सावंत*
*कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, कृषी,डेअरी व पशुपक्षी प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*
पंढरपूर/प्रतिनिधी
स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भारत कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले.
सुरुवातीला स्व. आमदार भारतनाना भालके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी बोलताना आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत म्हणाले की स्वर्गीय आमदार भारतनाना भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील दिलखुलास नेते होते. जनतेच्या हितासाठी शेवटपर्यंत त्यांनी काम केले. नाना सध्या असते तर पंढरपूरचे चित्र वेगळेच पहावयास मिळाले असते असे उद्गार काढत स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या आठवणींना उजाळा दिला.
पुढे बोलताना ते म्हणाले की
शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी फार्मिंग एअरपोर्ट केले पाहिजे अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचे सांगितले.
नागरिकांची घरे उध्वस्त न करता पंढरपूर येथील नागरिकांना विश्वासात घेऊनच विकास कामे करावीत. त्या अगोदर भीमा नदीची स्वच्छता याचबरोबर अनेक असलेली प्रलंबित कामे करण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी राजकारणातील अनेक किसे सांगितले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन केल्याने भगीरथ भालके यांना शुभेच्छा दिल्या.
सुरुवातीला प्रस्तावनेत भगीरथ भालके यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी केलेल्या कामांची आठवण करून देत
मंगळवेढाचा ३५ गावचा पाणी प्रश्न मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली.
याचबरोबर पंढरपूर कॅरिडॉर बाबत नागरिकांना विश्वासात घेऊन काम करावे.
आगामी काळात योग्य प्रमाणावर पाण्याचे वाटप व्हावे.शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रलंबित कामे मार्गी लावण्याची विनंती भगीरथ भालके यांनी सावंत यांच्या कडे केली.
यावेळी आमदार यशवंत माने, कल्याणराव काळे, गणेश पाटील,अमोल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर हे होते. तर व्यासपीठावर मोहोळचे आमदार यशवंत माने, शिवसेना सोलापूर संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, शिवसेनेचे अमोल शिंदे, पुरोगामी आघाडीचे डॉ.बाबासाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश पाटील, युवराज पाटील, मा.व्हाईस चेअरमन विठ्ठल सहकारी साखर कारखाना लक्ष्मण पवार, चंद्रकांत भालके आदींसह पंढरपूर,मंगळवेढा व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शुक्रवार दिनांक २३ ते २६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान येथील रेल्वे मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे.
या राज्यस्तरीय महोत्सवामध्ये
विशेष आकर्षण असलेला दीड टनाचा गजेंद्र रेडा, अडीच फुटाची पुंगनूर गाय, पंढरपुरी म्हैस, खिलार गाय, गीर गाय, आठ किलोचा कोंबडा व विविध प्रकारचे पक्षी शेतकऱ्यांना पाहावयास मिळणार आहेत.
या दरम्यान आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
याचबरोबर महिलांसाठी हळदीकुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गीय आमदार भारतनाना भालके फाउंडेशन पंढरपूर मंगळवेढा, सहप्रयोजक साईश्री ऍग्रो कंपनी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी खिलार गाई प्रदर्शन, शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी भव्य शेतकरी मेळावा व चर्चासत्र, रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत डॉग शो, कॅट शोचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ६ नंतर महिलांसाठी होम मिनिस्टर व हळदीकुंकू समारंभ कार्यक्रम, सोमवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात चर्चासत्र व सायंकाळी ६ वाजता ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, पशुपक्षी प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मिळणार आहे.