*मागील वर्षाच्या तुलनेत उत्पन्नात १ कोटी २० लाख रुपयांची वाढ*
पंढरपूर, दि. २५ : कार्तिकी यात्रा २०२६ च्या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी वारकरी भाविकांनी भरभरून दान अर्पण केले. या यात्रेदरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला विविध देणग्या, हुंडीपेटी, लाडू प्रसाद विक्री, भक्तनिवास तसेच सोने-चांदीच्या अर्पणातून एकूण ६ कोटी ३९ लाख ३५ हजार २२ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. मागील वर्षाच्या कार्तिकी यात्रेच्या तुलनेत यंदा उत्पन्नात १ कोटी २० लाख ५७ हजार ७९४ रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.
कार्तिकी शुद्ध प्रतिपदा (दि. १० नोव्हेंबर) ते कार्तिकी शुद्ध पौर्णिमा (दि. २४ नोव्हेंबर) या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ ५१ लाख ५५ हजार १५४ रुपये अर्पण केले. देणगी स्वरूपात १ कोटी ४३ लाख ६१ हजार ६५७ रुपये, लाडू प्रसाद विक्रीतून ४८ लाख ५८ हजार ५०० रुपये, भक्तनिवासातून ५९ लाख ८५ हजार २४४ रुपये, हुंडीपेटीतून १ कोटी ४१ लाख ४० हजार ७८० रुपये, पूजेतून ३ लाख ३० हजार ४७५ रुपये, तर सोने-चांदीच्या अर्पणातून १ कोटी ८४ लाख २२ हजार ४१५ रुपये प्राप्त झाले आहेत. तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमांतून ६ लाख ८० हजार ७९७ रुपये उत्पन्न मिळाले आहे.
मागील वर्षीच्या कार्तिकी यात्रेत श्रींच्या चरणाजवळील अर्पण, देणगी, लाडू प्रसाद विक्री, भक्तनिवास, हुंडीपेटी, पूजा, सोने-चांदीचे अर्पण तसेच अन्य माध्यमांतून एकूण ५ कोटी १८ लाख ७७ हजार २२८ रुपये उत्पन्न प्राप्त झाले होते. यंदा हे उत्पन्न ६ कोटी ३९ लाख ३५ हजार २२ रुपये झाले असून, मागील वर्षाच्या तुलनेत १ कोटी २० लाख ५७ हजार ७९४ रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
भाविकांकडून प्राप्त होणाऱ्या देणगीचा विनियोग वारकरी व भाविकांना अधिकाधिक दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील, असे मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी सांगितले.



















