*कार्तिकी यात्रेनिमित्त भाविकांना २४ तास दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बंद ठेवलेले राजोपचार पुन्हा सुरू*
पंढरपूर, दि. २८ नोव्हेंबर : कार्तिकी एकादशी दि. २१ नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. कार्तिकी यात्रेच्या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन, परंपरेनुसार योग्य मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढण्यात येतो. यामुळे भाविकांना चोवीस तास अखंड दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देता येते. त्यानुसार दि. १४ नोव्हेंबर रोजी श्रींचा पलंग काढून श्री विठ्ठलास लोड व श्री रुक्मिणी मातेस तक्या देण्यात आला होता.
या कालावधीत भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन घेता यावे, यासाठी पहाटेची काकड आरती, नित्यपूजा, पोशाख, धुपारती, शेजारती आदी नियमित राजोपचार प्रक्षाळपूजेपर्यंत स्थगित ठेवण्यात आले होते.
आज शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा विधिवत संपन्न झाली. श्री विठ्ठलाची प्रक्षाळपूजा मंदिर समितीचे सदस्य अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांच्या हस्ते, तर श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा व्यवस्थापक प्रवीण कुमार गम यांच्या हस्ते करण्यात आली. पूजेच्या प्रारंभी कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते श्री विठ्ठलास प्रथम स्नान घालण्यात आले. त्यानंतर धार्मिक विधी व मंत्रोच्चारात प्रक्षाळपूजेचे सर्व सोपस्कार पार पडले.
प्रक्षाळपूजेनिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस आकर्षक अलंकार
प्रक्षाळपूजेनंतर श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, नाम, निळाचा कौस्तुभमणी, दंडपेठ्याजवळ हिऱ्याचे कंगनजोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, मारवाडी तुळशीची माळ, शिरपेच, तोडे जोड, जवेची माळ व एकदाणी आदी अलंकार परिधान करण्यात आले.
तसेच श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुखवटा, वाक्या, तोडे जोड, चांदवड रोड, चिंचपेटी, तांबडी जवमणी, पदक, जवाच्या माळा, तुळशीची माळ, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल सरी व कंबरपट्टा आदी अलंकार परिधान करून पारंपरिक साजशृंगार करण्यात आला.
आजपासून सर्व नित्य राजोपचार पूर्ववत सुरू
देवाचा शिणवटा व थकवा दूर होण्यासाठी आयुर्वेदिक काढ्याचा नैवेद्य रात्री शेजारतीच्या वेळी श्रींस अर्पण करण्यात येणार आहे. प्रक्षाळपूजेनंतर आजपासून श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचे पहाटे होणारे काकड आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोशाख, धुपारती व शेजारती यांसह सर्व नियमित राजोपचार परंपरेनुसार पूर्ववत सुरू करण्यात येत आहेत.
यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे, सदस्या माधवी निगडे, सदस्य संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, विभागप्रमुख संदीप कुलकर्णी, पांडुरंग दशपुत्रे तसेच पूजेचे धार्मिक विधी पार पाडणारे कर्मचारी उपस्थित होते.
कार्तिकी यात्रेच्या कालावधीत भाविकांना अखंड दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर प्रक्षाळपूजेने मंदिरातील नियमित धार्मिक परंपरा व राजोपचारांना पुन्हा सुरुवात असल्याबाबतची माहिती कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.


















