कार्तिकी यात्रा सांगता समारंभानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ५ हजार किलो रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट

*प्रक्षाळ पूजेनिमित्त मंदिराला फुलांचा मनमोहक साज; ३० हून अधिक प्रकारच्या फुलांचा वापर*

पंढरपूर, दि. २८ :
कार्तिकी यात्रा २०२६ च्या सांगता समारंभानिमित्त आज शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रक्षाळ पूजा केली जाते, आषाढी व कार्तिकी यांसारख्या मोठ्या यात्रांच्या कालावधीत श्रींच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात येतात. यात्रेच्या काळात श्रींच्या नित्योपचारांसह विविध धार्मिक विधी पार पडतात. यात्रेची सांगता झाल्यानंतर श्रींच्या नित्योपचारांमध्ये नियमितता आणण्याच्या अनुषंगाने प्रक्षाळ पूजा केली जाते. या पूजेला मंदिरातील धार्मिक परंपरेत विशेष महत्त्व आहे.

या प्रक्षाळ पूजेचे औचित्य साधून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. अमोल शेरे व अभिजित मोहिते यांच्या सहकाऱ्यांनी ही सजावट केली असून, यासाठी सुमारे ५ हजार किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे.

गुलाब, झेंडू, शेवंती, लिली, गलांडा, आष्टर, ऑर्किड, गॅलोडा, जिनो, कार्नेशियन अशा ३० हून अधिक प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांसह विविध आकर्षक पानांचा सजावटीमध्ये वापर करण्यात आला आहे. विविध रंगसंगती आणि कलात्मक पुष्परचनांमुळे श्री विठ्ठल मंदिर, श्री रुक्मिणी माता मंदिर तसेच मंदिर परिसराला मनमोहक स्वरूप प्राप्त झाल्याचे माहिती व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.

प्रक्षाळ पूजेच्या धार्मिक सोहळ्यासोबतच फुलांनी सजलेले मंदिर भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरले. ही आकर्षक पुष्पसजावट पाहण्यासाठी दिवसभर भाविकांनी मंदिरात गर्दी केली असल्याचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here