*घटनास्थळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी भेट दिली*
पंढरपूर(प्रतिनिधी ):-
पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात शेतामध्ये विहीर खोदण्याचे काम सुरू असताना माती आणि दगडांचा मोठा भराव अचानक कोसळून चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
रविवार दि.१५नोव्हेंबर रोजी सकाळी १०वाजता ही अनपेक्षित आणि दुर्दैवी घटना घडली,
आंबे गावातील एका शेतामध्ये सुमारे ३० फूट खोल विहीर खोदण्याचे काम सुरू होते. यावेळी विहिरीत काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर अचानक माती आणि दगडांचा मोठा ढिगारा कोसळला. काही क्षणांतच चारही कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या अनपेक्षित दुर्घटनेमुळे घटनास्थळी एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतील माती आणि दगडांचा भराव बाजूला करून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत चारही कामगारांना आपला जीव गमवावा लागला.
या दुर्घटनेत मंगेश मोरे आणि सिद्धेश्वर घाडगे (रा. रांजणी, ता. पंढरपूर) तसेच तानाजी घोडके आणि आबा घोडके (रा. अनवली, ता. पंढरपूर) या चार कामगारांचा मृत्यू झाला. कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या कामगारांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्यात सध्या भयानक दुष्काळाचे वातावरण असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह मजुरांच्या हाताना कोणतेही काम नाही, यामुळे गोरगरीब आणि हातावर पोट असलेले शेकडो शेतमजूर मिळेल ते काम करून कशीबशी गुजराण करत आहेत,
दिवस बाहेर पाडण्यासाठी कोणतेही धोक्याचे काम लोक करत असून यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या घटनेबद्दल सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी मृत चारही कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच मंगेश मोरे, सिद्धेश्वर घाडगे, तानाजी घोडके आणि आबा घोडके यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या असह्य दुःखातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.




















