*दूध, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी व हॉटेलमधील खाद्यपदार्थांवर प्रशासनाची नजर*
पंढरपूर (दि, 13 ): कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. पंढरपूर शहर व परिसरातील दूध व दुग्धजन्य पदार्थ, बेकरी पदार्थ तसेच हॉटेलमधील खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
कार्तिकी यात्रा सोहळा 10 ते 24 नोव्हेंबर 2026 या कालावधीत होत आहे. या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी आणि चंद्रभागा स्नानासाठी लाखो भाविक पंढरपुरात येतात. कार्तिकी एकादशीपासून गोपाळकाल्यापर्यंत वारकरी शहरात वास्तव्यास असल्याने त्यांच्या भोजनामध्ये दूध, बासुंदी, खीर यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. दूध व दुग्धजन्य पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यात भेसळ झाल्यास भाविकांना विषबाधा होऊन त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्याने प्रशासनाने यंदा विशेष खबरदारी घेतली आहे. वारकऱ्यांना सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी दूध, दुग्धजन्य पदार्थ व खिचडी आदी खाद्यपदार्थांचे नमुने तपासण्यात येणार आहेत.
या अनुषंगाने उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (2) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून पंढरपूर शहर व परिसरात अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणे तसेच विषबाधा होण्यास कारणीभूत ठरेल अशी परिस्थिती निर्माण करण्यास प्रतिबंध करणारे आदेश जारी केले आहेत.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.



















