कार्तिकी यात्रेत दर्शनरांगेतील घुसखोरीला प्रतिबंध -उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

पंढरपूर (दि, 13 ): कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दर्शनरांगेत होणारी घुसखोरी रोखण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (2) अन्वये हे आदेश पारित करण्यात आले आहेत.
कार्तिकी यात्रा सोहळा दि. 10 ते 24 नोव्हेंबर 2026 या कालावधीत होत असून, या काळात लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होतात. दर्शनासाठी भाविकांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे दर्शनरांगेचे योग्य व्यवस्थापन आणि शिस्त राखणे आवश्यक आहे.
यात्रा कालावधीत काही व्यक्तींकडून दर्शनरांगेत घुसखोरी होत असल्याच्या घटना प्रसारमाध्यमांतून तसेच भाविकांच्या तक्रारींतून निदर्शनास आल्या आहेत. अशा प्रकारांमुळे रांगेत गोंधळ निर्माण होऊन चेंगराचेंगरी अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार, श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनरांगेत घुसखोरी करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कार्तिकी यात्रेदरम्यान दर्शन व्यवस्था सुरळीत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध राहण्यासाठी भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here