*श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती संवर्धनाबाबत तज्ज्ञांकडून निरीक्षण*

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणामार्फत होणार संवर्धन

पुढील आठवड्यात बैठक घेऊन होणार अंतिम निर्णय – जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

पंढरपूर, दि.5: श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूळ मूर्तीचे स्वरूप बदलू नये तसेच मूर्ती संवर्धनाबाबतची‌ प्रक्रिया दीर्घकालीन टिकावी यासाठी मूर्ती संवर्धन तज्ज्ञांकडून निरीक्षण करून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणामार्फत संवर्धन करण्यात येणार आहे .याबाबत पुढील आठवड्यात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सांगितले.

श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या संवर्धनासंदर्भात मंदिर समिती, सल्लागार परिषद, स्थानिक महाराज मंडळी तसेच पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक दिनांक 5 जून रोजी दुपारी 12.30 वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास येथे जिल्हाधिकारी तथा सल्लागार परिषदेचे पदसिद्ध सदस्य एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींना झीज होत असल्याने यापूर्वी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत सन 1988, 2005, 2012 आणि 2020 मध्ये मूर्तींचे संवर्धन करण्यात आले होते. मागील संवर्धनास जवळपास पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मूर्तींमध्ये पुन्हा काही प्रमाणात झीज होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागामार्फत मूर्तींची तपासणी करून अहवाल सादर करण्यात आला होता. सदर अहवालावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली असून, संवर्धनासाठी शासनाची आवश्यक मंजुरी घेण्यात आली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाहीसाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे सदस्य, सल्लागार परिषदेचे सदस्य, स्थानिक महाराज मंडळी, पुरातत्त्व विभाग पुणे कार्यालयाचे अधिकारी तसेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, छत्रपती संभाजीनगर येथील अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या संवर्धनाची आवश्यकता, विशेषतः श्रींच्या चरणभागाची झालेली झीज, तसेच मूर्तींचे आयुष्य वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या संवर्धनात्मक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी पुढील आठवड्यात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे तज्ज्ञ अधिकारी, स्थानिक महाराज मंडळी, मंदिर समितीचे सदस्य, सल्लागार परिषद सदस्य तसेच विषयातील तज्ज्ञ व्यक्ती यांच्या उपस्थितीत मूर्तींचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यक संवर्धनात्मक उपाययोजना निश्चित करून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत मूर्तींचे संवर्धन करण्यात येणार आहे.

मूर्ती संवर्धनाची संपूर्ण प्रक्रिया पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडण्यात येईल, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here