पंढरपूरला ‘अपर जिल्हाधिकारी’ कार्यालयाचा मार्ग मोकळाआमदार समाधान अवताडेंच्या पाठपुराव्याला यश

पंढरपूर / प्रतिनिधी

पंढरपूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय कार्यान्वित करण्याच्या मागणीला अखेर यश आले आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत राज्याच्या महसूल विभागाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी पंढरपूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय कार्यान्वित करण्यास मान्यता देणारा शासन निर्णय जारी केला आहे.

सोलापूर जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार, वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण लक्षात घेता पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला, मोहोळ व मंगळवेढा या तालुक्यांतील नागरिकांना जिल्हास्तरीय महसूल कामांसाठी सोलापूरला जावे लागत होते. नागरिकांची गैरसोय दूर करून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने पंढरपूर येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला, मोहोळ आणि मंगळवेढा हे सात तालुके पंढरपूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राहणार आहेत. तर सोलापूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी आणि अक्कलकोट हे चार तालुके राहतील.

नवीन कार्यालयासाठी अपर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांची पदस्थापना शासनस्तरावरून करण्यात येणार असून, इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदस्थापना जिल्हाधिकारी करतील. सुरुवातीला तात्पुरती जागा निश्चित करून कार्यालय सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यानंतर कायमस्वरूपी जागा शोधून कार्यालयाच्या बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश आहेत. या कार्यवाहीचा १५ दिवसांत शासनाला अहवाल सादर करावा लागणार आहे.

तरी, सदर प्रस्तावांच्या बाबत मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे महसूल सचिव विकास खारगे यांची भेट घेत पंढरपूर अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्याबाबत त्वरित शासन निर्णय जाहीर करण्याचे सांगितले. त्यानंतर तात्काळ हा निर्णय मंजूर करण्यात आला.

या निर्णयाने, पंढरपूरसह सात तालुक्यांच्या नागरिकांना महसूल प्रशासन अधिक जवळ येणार असल्याने या निर्णयाचे महत्त्व वाढले आहे. या निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई ताई पवार, आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आमदार समाधान आवताडे यांनी आभार मानले आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here