*१३० कोटींच्या दर्शन मंडपास शिखर समितीची मंजुरी : आ. समाधान आवताडे यांची माहिती*

*तिरुपतीच्या धर्तीवर टोकन दर्शन सोय होणार : ६ हजार भाविकांसाठी वातानुकूलित दर्शन मंडप*

पंढरपूर :-
येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी १३० कोटी रुपयांच्या दर्शन मंडप आणि स्काय वॉक आराखड्यास तीर्थक्षेत विकास आराखडा शिखर समितीने मंजुरी दिली आहे, लवकरच या आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल. हा दर्शन मंडप उभा राहिल्यानंतर टोकन दर्शन सुविधा सुरु करण्यात येईल. ६ हजार भाविकांची सोय होणार आहे, अशी माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना आ.आवताडे म्हणाले कि, तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थतीतीत बैठक संपन्न झाली. या बैठकीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या दर्शन मंडप आणि स्काय वॉक आराखड्यास शिखर समितीने मंजुरी दिली. भाविकांची वाढती संख्या आणि दर्शन रांगेत सुविधा पुरवताना प्रशासनावर येणारा ताण लक्षात घेता या आराखड्यास तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार या शिखर समितीची बैठक झाली आणि १३० कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळाली. यानंतर लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आराखड्यास मंजुरी मिळेल आणि लवकरात लवकर पुढील कारवाई सुरु होईल. या दर्शन मंडप आराखड्यात १६ हजार चौरस मीटरचा २ मजली दर्शन मंडप, आणि दर्शन मंडप ते विठ्ठल मंदिर पूर्व प्रवेशद्वार असा १०५० मीटर्स लांबीचा स्काय वॉक, दर्शन मंडप वातानुकूलित, दर्शन मंडपास ६ लिफ्ट आणि २ रॅम्प, cctv, ३० पास स्कॅनींग काउंटर, हिरकणी कक्ष, उपहार गृह, वैद्यकीय सेवा,स्त्री, पुरुष आणि दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रथमोपचार सुविधा, अग्निशमन यंत्रणा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणार आहे, भाविकांची गरज लक्षात घेता भविष्यात दर्शन मंडपाची क्षमता वाढवण्यात येणार आहे. सहा हजार भाविकांची क्षमता असली तरी आताच त्यात वाढ करून १० हजार भाविकांची क्षमता वाढवावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. या दर्शन मंडपाची देखभाल पंढरपूर नगरपालिका करणार आहे, असेही आ. आवताडे यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here