मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री संत तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन

*’राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’-मुख्यमंत्र्यांचे साकडे*

*वारीत वारकऱ्यांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधामुळे पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाच्या कामाचे कौतुक*

पंढरपूर, दि. २२: “राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, सर्वांना सुखी ठेव,” असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दसूर पाटी येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेताना घातले. त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाचे काही वेळ सारथ्यही केले.

वारीत चालणारे सर्व वारकरी हे माऊलीचे जिवंत स्वरूप असल्याने वारीत चालण्याचा आनंद व्यक्त करतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, माऊलीकडे एकच मागणं आहे ते म्हणजे सर्वत्र पाऊस चांगला पडू दे व शेतकरी बांधवांना सुखी समाधानी राहू दे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात मागील दोन वर्षांपासून पालखीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा शासन उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे यावर्षीच्या वारीला प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविक येत असून मागील सर्व वाऱ्यांचा संख्यात्मक विक्रम तुटेल.

जिल्हा प्रशासनाकडून वारीमध्ये उत्तम सुविधा करण्यात आल्या आहेत. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून भाविकांची संख्या ही मोजली जात आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी चांगले काम केले आहेत.

वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून त्याप्रमाणे स्वच्छता झाली आहे. शौचालये, सफाई कर्मचारी, पुरेसा पाणीपुरवठा, पिण्याचे पाणी, जर्मन हँगर, चरण सेवा उपक्रम, आरोग्य पथके आदींच्या माध्यमातून सुविधा देण्यात येत आहेत, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन घेण्याचा योग आला हे माझे मोठे भाग्य आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

प्रारंभी पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आषाढी वारी २०२६ च्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांना सविस्तर माहिती दिली.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार अभिजीत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here