पंढरपूर:-
पंढरपूर-मंगळवेढ्यात काँग्रेसमध्ये फूट; भगीरथ भालकेंवर नाराज होत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत, काँगेस कडून भगीरथ भालके रिंगणात आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयामुळे तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. काँग्रेसआयच्या पदाधिकाऱ्यांनी नाराज होऊन, आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.आज शनिवार दिनांक 9 नोव्हेंबरला विठ्ठल इन कार्यालय, स्टेशन रोड, पंढरपूर या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय घेतला गेला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी पंढरपूर शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी आणि पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे आभार मानले.
माध्यमांशी बोलताना अनिल सावंत म्हणाले, पंढरपूर मंगळवेढा हा राष्ट्रवादीचा पारंपारिक मतदारसंघ आहे. काल जयंत पाटील यांनी देखील अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट केलं आहे. या मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे, हा प्रश्न नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढून ही जागा निश्चितपणे जिंकणार आहोत.