*उज्जैन-इंदोर, मडगाव, देहूरोड, मुंबईसाठी नव्या रेल्वे गाड्या सुरू करा – प्रणव परिचारक*

मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांकडे विविध मागण्या

पंढरपूर : पंढरपूर शहराती ल प्रवासी, व्यापारी, विद्यार्थी तसेच लाखो भाविकांच्या सोयीसाठी विविध नवीन रेल्वे सेवा सुरू कराव्यात, काही महत्त्वाच्या गाड्यांचा विस्तार करावा तसेच पंढरपूर रेल्वे स्थानकावरील मूलभूत सुविधांमध्ये वाढ करावी, अशी मागणी भाजप नेते तथा सदस्य, क्षेत्रीय रेल उपयोगकर्ता परामर्श दात्री समिती, मुंबईचे सदस्य अ‍ॅड. प्रणव परिचारक यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव यांच्याकडे केली आहे.

मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव व मंडल रेल प्रबंधक सुजित मिश्रा यांनी पंढरपूर रेल्वे स्थानकाला भेट दिली. यावेळी अ‍ॅड. परिचारक यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

पंढरपूर–पुणे–देहूरोड अथवा पनवेलपर्यंत नवीन दैनिक इंटरसिटी अथवा एक्सप्रेस सुरू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. ही गाडी पंढरपूर, आळंदी व देहूरोड या धार्मिक स्थळांना जोडणारी ठरणार असून विद्यार्थी, नोकरदार व भाविकांसाठी ती उपयुक्त ठरेल, असे परिचारक यांनी सांगितले.

तसेच, कोल्हापूर–सोलापूर–कोल्हापूर साप्ताहिक रेल्वे सेवा दर गुरुवारी सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. कोल्हापूर येथे गुरुवारी विनावापर असलेल्या रेकचा या सेवेसाठी वापर करता येऊ शकतो, असेही त्यांनी सुचविले.

पंढरपूर–कुर्डुवाडी मार्गावर लोकल सेवा सुरू करून कुर्डुवाडी जंक्शनमार्गे देशातील विविध भागांशी पंढरपूरची कनेक्टिव्हिटी वाढविण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, गाडी क्रमांक २२९४३/२२९४४ दौंड–इंदौर एक्सप्रेस पंढरपूरपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या सेवेमुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना उज्जैन, इंदौर, सुरत व वडोदरा येथे थेट रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे.

सध्या आठवड्यातून तीन दिवस धावणारी पंढरपूर–दादर एक्सप्रेस दैनिक स्वरूपात सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली. गोवा, कोकण व कर्नाटकातून पंढरपूरला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मडगाव–मिरज–पंढरपूर साप्ताहिक एक्सप्रेस सुरू करण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला. गोवा भवन उभारण्याच्या प्रस्तावामुळे या मागणीला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे परिचारक यांनी नमूद केले.

स्थानकावरील सुविधांबाबत पंढरपूर रेल्वे स्थानकावर वृत्तपत्र व पुस्तक विक्री केंद्र, प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र अथवा वैद्यकीय दुकान सुरू करावे, संपूर्ण स्थानक परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारावी, तसेच अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन किमान दोन नवीन प्लॅटफॉर्म उभारून त्यावर लिफ्टसह आधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही अपेक्षा परिचारक यांनी व्यक्त केली. या सर्व मागण्यांवर रेल्वे प्रशासनाशी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here