आषाढी वारीच्या नियोजनाप्रमाणेच कार्तिकी वारी यशस्वी करा -पालकमंत्री जयकुमार गोरे

*कार्तिकी यात्रेत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य; वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्या*

*सर्व विभागांनी जबाबदारीने व परस्पर समन्वयाने काम करावे; निधीची कमतरता भासू देणार नाही*

पंढरपूर, दि. १८ : आषाढी वारीच्या नियोजनाचे आणि वारकऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचे देशभरात कौतुक झाले आहे. त्याच धर्तीवर यंदाची कार्तिकी वारीही यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय विभागांनी जबाबदारीने व परस्पर समन्वयाने काम करावे. कार्तिकी यात्रेत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देऊन पंढरपूर शहरात सर्वत्र स्वच्छता राखावी. वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

 

या बैठकीस जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजीत औटी, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

कार्तिकी यात्रेत राज्याच्या विविध भागांतून लाखो वारकरी व भाविक पंढरपुरात येतात. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री गोरे यांनी दिले.

जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिकेने आपल्या हद्दीतील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत. दर्शन रांगेतील भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, शौचालये, मॅट आणि पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी. आषाढी यात्रेच्या वेळी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांप्रमाणेच कार्तिकी यात्रेतही सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

दर्शन रांगेत घुसखोरी होणार नाही, यासाठी पोलीस प्रशासन आणि मंदिर समितीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. भाविकांना जलद व सुलभ दर्शन मिळण्यास प्राधान्य द्यावे. व्हीआयपी दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद ठेवावी. मंदिर समितीने प्रशिक्षित सुरक्षारक्षक नेमावेत. त्यांच्या चारित्र्याची पडताळणी करून अहवाल सादर करावा. मंदिर समितीचे कर्मचारी व सुरक्षारक्षकांनी भाविकांशी सौजन्याने वागावे. शासकीय महापूजेचे नियोजन पोलीस प्रशासनाच्या सूचनांनुसार करावे, असेही त्यांनी सांगितले.

भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाण्याची नियमित तपासणी करावी. महावितरणने यात्राकाळात अखंडित व सुरक्षित वीजपुरवठा करावा. नदीपात्रात होडीतून प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी पुरेशा प्रमाणात लाईफ जॅकेट उपलब्ध करून द्यावेत. पंढरपूर शहर व परिसरात मांस-मटण आणि मद्यविक्री पूर्णपणे बंद ठेवण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.

वाखरी येथे जनावरांचा मोठ्या प्रमाणात बाजार भरत असल्याने त्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. बाजार संपल्यानंतर पालखीतळाची स्वच्छता करावी. यात्राकाळात सोपविण्यात आलेली कामे सर्व विभागांनी जबाबदारीने आणि परस्पर समन्वयाने पूर्ण करावीत. यंदाची कार्तिकी यात्रा सुरक्षित, सुरळीत व सुखकर पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी नियोजनबद्ध काम करावे. प्रादेशिक परिवहन विभागाने वारकऱ्यांच्या वाहनांना विनाकारण अडचणी निर्माण करू नयेत, असेही पालकमंत्री गोरे यांनी निर्देशित केले.

प्रारंभी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी प्रशासनाने कार्तिकी वारीच्या अनुषंगाने केलेल्या तयारीची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सादर केली. तर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी मंदिर समितीमार्फत भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा व शासकीय महापूजेच्या नियोजनाबाबतची माहिती दिली तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी कार्तिकी वारीच्या नियोजनाची माहिती बैठकीत दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here