वारकरी-भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर समितीची जय्यत तयारी- सह.अध्यक्ष गहिनीनाथ महाराज

*२४ तास दर्शन व्यवस्था*

*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते श्रींची शासकीय महापूजा संपन्न होणार*

महेश कदम
पंढरपूर, दि. १७ : कार्तिकी शुद्ध एकादशी दि. २१ नोव्हेंबर रोजी असून, यात्रा कालावधी दि. १० ते २४ नोव्हेंबर असा आहे. या कालावधीत सुमारे ८ ते १० लाख भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे येण्याची शक्यता आहे. यात्रेसाठी येणाऱ्या वारकरी-भाविकांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत व्यापक नियोजन करण्यात आले आहे. मंदिरातील धार्मिक प्रथा, परंपरा, विधी तसेच दर्शन व्यवस्था व भाविकांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधांचे नियोजन अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

कार्तिकी शुद्ध एकादशीच्या दिवशी पहाटे २.२० वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. यात्रा कालावधीत भाविकांच्या सोयीसाठी दर्शनरांगेत बॅरिकेडिंग, ताडपत्री शेड, अतिरिक्त पत्राशेड, आपत्कालीन प्रवेशद्वारे, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची व्यवस्था, थेट दर्शन सुविधा, कुलर, पंखे व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

*दर्शनरांग व्यवस्थापनासाठी विशेष उपाययोजना*

प्रतिवर्षी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन दर्शनरांग व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यात आले आहे. श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपातील आठ गाळ्यांपैकी दोन गाळ्यांचा दर्शन व्यवस्थेसाठी वापर करण्यात येणार आहे. दर्शन मंडप ते कासार घाटापर्यंत स्कायवॉक, तसेच स्कायवॉक ते रिद्धी-सिद्धी दर्शन मंडपापर्यंत बॅरिकेडिंग व ताडपत्री शेड उभारण्यात येत आहे.

मुखदर्शनासाठी श्री संत तुकाराम भवन ते छत्रपती संभाजी चौकपर्यंत बॅरिकेडिंग व ताडपत्री शेड उभारण्यात आले असून, छत्रपती संभाजी चौक येथे हलता पूल बसविण्यात आला आहे.

*दर्शनरांगेत पिण्याचे पाणी, आरोग्य व स्वच्छतेच्या सुविधा*

दर्शनरांगेत भाविकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, चहा, खिचडी वाटप, कुलर, भक्तिगीते, लाईव्ह दर्शन, हिरकणी कक्ष, चार ते पाच विश्रांती कक्ष, आपत्कालीन नियंत्रण कक्ष (ईओसी), हरवले-सापडले विभाग, अन्नछत्र, सार्वजनिक सूचना प्रणाली, स्वच्छतागृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, अतिदक्षता विभाग, चौकशी कक्ष, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

देणगी व्यवस्थेसाठी अतिरिक्त स्टॉल, सोने-चांदीच्या भेटवस्तू स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष, वेदांत, व्हिडिओकॉन व श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे भाविकांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी अपघात विमा योजना राबविण्यात येणार असून, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीमही राबविण्यात येणार आहे. याशिवाय बहुभाषिक चौकशी कक्ष, दोन अद्ययावत रुग्णवाहिका, उपजिल्हा रुग्णालयामार्फत अतिदक्षता विभाग व प्रथमोपचार केंद्र तसेच बाजीराव पडसाळी येथे तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयामार्फत वैद्यकीय कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, श्री संत तुकाराम भवन व श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांसाठी बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. चंद्रभागा नदीपात्रात महिला भाविकांना कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूम, दर्शनरांगेत हिरकणी कक्ष तसेच कार्तिकी एकादशीनिमित्त मंदिरात विशेष फुलांची सजावट करण्यात येणार आहे.

*सुरक्षा व्यवस्थेसाठी आधुनिक यंत्रणांचा वापर*

भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्ट्रक्चरल ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट, बॅग स्कॅनर मशीन, मॅन काउंटिंग मशीन, सुमारे २०० सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, जनरेटर, ४० वॉकी-टॉकी संच, सार्वजनिक सूचना प्रणाली व चौकशी कक्ष आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

महिला भाविकांच्या सुरक्षिततेसाठी महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांसह १५ चेंजिंग रूम व ६ हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.

कार्तिकी यात्रा निर्विघ्न, सुरक्षित व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य आमदार रामचंद्र कदम, शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, प्रणिता भालके, कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, व्यवस्थापक प्रविणकुमार घम, लेखाधिकारी मुकेश अनेचा तसेच मंदिर समितीचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक व संबंधित शासकीय यंत्रणा समन्वयाने परिश्रम घेत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here