– अप्पर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्ट
* 4 हजार 656 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती
* 335 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे गर्दीवर नजर
* नऊ प्रशिक्षित कार्ट पथके तैनात; सात ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्रे
पंढरपूर, दि. 17 : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या कार्तिकी यात्रेसाठी लाखो वारकरी व भाविक दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने व्यापक सुरक्षा नियोजन केले आहे. कार्तिकी शुद्ध एकादशी 21 नोव्हेंबर 2026 रोजी असून, यात्रेच्या कालावधीत वारकरी, भाविक आणि स्थानिक नागरिकांची सुरक्षितता अबाधित राखण्यासह वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. यात्रेच्या बंदोबस्तासाठी एकूण 4 हजार 656 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, गर्दी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियमन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विविध पथके कार्यरत राहणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी दिली.
कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल होतात. चंद्रभागा नदीचे वाळवंट, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर, महाद्वार घाट, दर्शन रांगा, पत्राशेड तसेच शहरातील प्रमुख चौकांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. गर्दीचे योग्य व्यवस्थापन करणे, भाविकांची गैरसोय टाळणे, चोरीसारख्या घटनांना प्रतिबंध करणे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी एक पोलीस अधीक्षक, एक अप्पर पोलीस अधीक्षक, 18 पोलीस उपअधीक्षक, 46 पोलीस निरीक्षक, 278 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 2 हजार 592 पोलीस अंमलदार, 100 गामा पथकाचे जवान आणि 1 हजार 620 होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच तीन राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) कंपन्या, दोन बॉम्ब शोधक व नाशक पथके (बीडीएस), दोन शीघ्र कृती पथके (आरसीपी), एक क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नऊ प्रशिक्षित कार्ट पथके तैनात करण्यात आली आहेत. या सर्व यंत्रणांच्या समन्वयातून यात्रेच्या संपूर्ण कालावधीत सुरक्षा व्यवस्था प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
यात्रेच्या कालावधीत नदीपात्र, 65 एकर, महाद्वार परिसर, महाद्वार घाट, पत्राशेड यांसह गर्दीच्या प्रमुख ठिकाणी वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. या माध्यमातून गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार असून, गर्दी वाढल्यास तातडीने आवश्यक उपाययोजना करता येणार आहेत. यात्रेत वारकरी आणि भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरी, पाकीटमारी तसेच इतर गैरप्रकार होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस प्रशासनाने विशेष उपाययोजना केली आहे. वारकरी व सामान्य नागरिकांच्या वेशात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करून ‘माऊली स्कॉड’ स्थापन करण्यात आले आहे. तसेच शहरातील महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी सुमारे 335 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार आहे. यामुळे गर्दीच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे, संशयास्पद घटनांची माहिती मिळविणे आणि आवश्यकतेनुसार तातडीने पोलीस मदत पोहोचविणे शक्य होणार आहे.
यात्रेसाठी येणाऱ्या वारकरी व भाविकांना तातडीने पोलीस मदत मिळावी, त्यांच्या अडचणींचे निराकरण व्हावे आणि आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, यासाठी सात ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सावरकर चौक, शिवाजी चौक, चंद्रभागा वाळवंट आणि अंबाबाई पटांगण यांसह प्रमुख ठिकाणी ही मदत केंद्रे कार्यरत राहणार आहेत. भाविकांना गर्दीचे व्यवस्थापन, सुरक्षित मार्ग, वाहतूक व्यवस्था तसेच आवश्यक सूचनांची माहिती मिळावी यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे.
कार्तिकी यात्रेच्या काळात पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणावर खासगी वाहने दाखल होतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, भाविकांना मंदिर परिसरात ये-जा करताना अडथळे निर्माण होऊ नयेत आणि आपत्कालीन सेवांची वाहने विनाअडथळा मार्गस्थ व्हावीत, यासाठी विशेष वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार जड वाहतूक शहराबाहेरून वळविण्यात आली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी 13 ठिकाणी डायव्हर्जन पॉईंट सुरू करण्यात आले आहेत. तसेच खासगी वाहनधारकांसाठी शहरात व शहराबाहेर मिळून 13 ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे.
कार्तिकी यात्रा ही महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील महत्त्वाची यात्रा आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा शांततेत, सुरक्षित आणि निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी नियोजन करण्यात आले आहे. वारकरी व भाविकांनी गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहावे, मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच पोलीस प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी केले आहे.


















