1500 स्वयंसेवकाचे 24 तास निस्वार्थ सेवा कार्य -मंदिर व्यवस्थापक प्रवीण कुमार घम

आषाढी यात्रा : कर्मचारी-स्वयंसेवकांसाठी भोजन व्यवस्था, महिला भाविकांसाठी १० चेंजिंग रूम, दर्शनरांगेत हिरकणी कक्ष व सरकता उड्डाणपूल; १,५०० स्वयंसेवकांचे २४ तास निस्वार्थ सेवाकार्य

पंढरपूर, दि. २० : आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो वारकरी व भाविक पंढरपुरात दाखल होत असून, त्यांच्या सेवेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सुमारे ३,००० अधिकारी, कर्मचारी, सेवेकरी व स्वयंसेवक यात्रेच्या नियोजनात कार्यरत असून, त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था, महिला भाविकांसाठी चेंजिंग रूम, दर्शनरांगेत हिरकणी कक्ष, मुखदर्शन रांगेत सरकता उड्डाणपूल तसेच १,५०० स्वयंसेवकांचे विना मोबदला २४ तास सेवाकार्य अशा विविध सुविधा मंदिर समितीने उपलब्ध करून दिल्या आहेत.

कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, यात्रेचे यशस्वी नियोजन हे हजारो कर्मचारी, अधिकारी आणि स्वयंसेवकांच्या सेवाभावी प्रयत्नांमुळे शक्य होत असून, त्यांच्या मूलभूत सुविधांबरोबरच वारकरी-भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि समाधानकारक दर्शन मिळावे, यासाठी सर्व स्तरांवर प्रभावी व्यवस्था करण्यात आली आहे.

यात्रेदरम्यान सेवा बजावणाऱ्या मंदिर समितीचे अधिकारी, कर्मचारी, रोजंदारीवरील सेवेकरी तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांसाठी श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये सकाळचा नाश्ता तसेच दुपारचे व रात्रीचे भोजनप्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे. या व्यवस्थेची जबाबदारी विभाग प्रमुख अरुण सरगर यांच्याकडे सोपविण्यात आली असून, दररोज सुमारे ६,००० ते ७,००० सेवेकरी या भोजनप्रसादाचा लाभ घेत आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून भोजनप्रसाद तयार करण्यात येत असल्याचेही कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.

महिला भाविकांच्या सोयीसाठी चंद्रभागा नदीपात्रात १० चेंजिंग रूम उभारण्यात आल्या आहेत. श्रींच्या दर्शनापूर्वी मोठ्या संख्येने महिला भाविक चंद्रभागेत स्नान करत असल्याने कपडे बदलण्यासाठी सुरक्षित व स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक चेंजिंग रूमजवळ २४ तास महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, एकावेळी ३० ते ४० महिला भाविक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

दर्शनरांगेत महिला व बालकांच्या सुविधेसाठी श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप, रिद्धी सिद्धी दर्शन मंडप व श्री विठ्ठल सभामंडप येथे चार हिरकणी कक्ष (स्तनपान गृह) उभारण्यात आले आहेत. याशिवाय दर्शनमंडपात सॅनिटरी नॅपकीनची उपलब्धता करण्यात आली असून, महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह मंदिर समितीच्या महिला स्वयंसेवकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

मुखदर्शन रांग अधिक सुलभ व गतिमान करण्यासाठी छत्रपती संभाजी चौक येथे मागील वर्षीप्रमाणे सरकता उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे मुखदर्शन रांगेचे नियोजन सुरळीत होत असून, प्रदक्षिणा मार्गावरील वाहतूक आणि भाविकांची हालचालही विनाअडथळा सुरू राहते. एकादशी दिवशी प्रदक्षिणा मार्गावरून जाणाऱ्या रथांना अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हा पूल सरकता स्वरूपाचा ठेवण्यात आला असून, आवश्यकतेनुसार अत्यंत कमी वेळेत पुलाचा वरचा भाग बाजूला करून रथ मार्गस्थ करता येतो. या ठिकाणी पूर्णवेळ तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, यांत्रिकी कार्यशाळेकडून पुलाच्या सुरक्षिततेचे प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे.

आषाढी यात्रेत भाविकांच्या सेवेसाठी आठ सेवाभावी संस्थांचे सुमारे १,५०० स्वयंसेवक कोणताही मोबदला न घेता २४ तास निस्वार्थ सेवाकार्य बजावत आहेत. मंदिर परिसराची स्वच्छता, दर्शनरांग व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सेवा, अन्नछत्रातील भोजनप्रसाद तयार करणे व वाटप, देणगी संकलन, चहा-खिचडी वितरण अशा विविध सेवांमध्ये हे स्वयंसेवक योगदान देत आहेत.

स्वकाम सेवा, आळंदी येथील स्वयंसेवक स्वच्छतेची जबाबदारी सांभाळत आहेत. श्री संत गजानन महाराज मठ, अकोला यांच्याकडून चहा व खिचडीचे वाटप करण्यात येत आहे. वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई आणि भारत सेवाश्रम संघ, मुंबई यांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विठ्ठल सेवा मंडळ, पुणे देणगी संकलनाचे काम पाहत असून, गीताई सेवा मंडळ, औसा येथील महिला स्वयंसेविका अन्नछत्रात भोजनप्रसाद तयार करण्यासाठी सहकार्य करत आहेत. विश्व सामाजिक सेवाभावी संस्था, आळंदी आणि श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ, आळंदी हे रांग व्यवस्थापन, स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहत आहेत. तर संत मिराजी महाराज सेवेधारी मंडळ, अकोला येथील स्वयंसेवक पत्राशेड येथील अन्नछत्रात भोजनप्रसाद तयार करून भाविकांना वितरित करत आहेत.

व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी सांगितले की, या सर्व सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक अनेक वर्षांपासून यात्राकालात अखंड सेवाभावाने कार्यरत आहेत. मंदिर समितीच्या वतीने त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांच्या योगदानामुळे आषाढी यात्रेचे नियोजन अधिक प्रभावी, सुरक्षित आणि भाविकाभिमुख झाले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here