आषाढी यात्रा श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा

 

२३ जुलै रोजी वाखरी पंढरपूर येथे
(वारकर्‍यांसाठी अभिनव उपक्रम )

पंढरपूर, २१ जुलै : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार, दि २३ जुलै २०२६ रोजी दुपारी १.३० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा वाखरी, पंढरपूर येथील पालखी तळाच्या शेजारी  विश्वशांती गुरुकुल परिसरात होणार आहे. वारकर्‍यांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड व वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेच्या संयोजन समितीचे सचिव प्रा.विलास कथुरे यांनी केले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन संत साहित्याचे गाढे अभ्यासक व उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हासदादा पवार, हिंद केसरी दिनानाथ सिंग व डबल महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धन सदगीर हे सन्माननीय प्रमुख पाहुणे असतील. आमदार समाधान आवताडे, महाराष्ट्र केसरी पै. आप्पासाहेब कदम आणि महाराष्ट्र केसरी पै. विष्णूतात्या जोशीलकर सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील.
आयोजित स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वारकरी मल्लांनी २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.३० वा. विश्वशांती गुरूकुलच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ आपली नावे नोंदणी करावी. सोबत वयाचा पुरावा म्हणून आपले आधार कार्ड किंवा शासनमान्य ओळखपत्र ठेवावे. अधिक माहितीसाठी प्रा. विलास कथुरे मो. नं. ९८५०२११४०४ , आणि  पै. राहुल बिराजदार मो. नं. ८००७५९३४३४ यांच्याशी संपर्क साधावा.
आयोजित स्पर्धा
वयोगट               प्रथम क्रमांक     द्वितीय क्रमांक        तृतीय क्रमांक
१६ ते २५ वर्ष         रु. ४,०००/-      रु. ३,०००/-            रु. २,०००/-
२६ ते ३५ वर्षे         रु. ५,०००/-      रु. ४,०००/-            रु. ३,०००/-
३६ ते ४५ वर्षे         रु. ६,०००/-       रु. ५,०००/-             रु. ४,०००/-
४६ ते ५५ वर्षे,        रु. ७,०००/-      रु. ६,०००/-             रु. ५,०००/-
५६ ते ६५ वर्षे         रु. ८,०००/-      रु. ६,०००/-             रु. ५,०००/-
७० वर्षाच्या पुढे      रु. ५,०००/-      रु. ३,०००/-             रु. २,०००/-
(प्रथम – सुवर्ण पदक, द्वितीय – रौप्य पदक, तृतीय – कांस्य पदक व रोख रक्कम)
विशेष आकर्षण म्हणजे योगमहर्षी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या स्मृति प्रित्यर्थ तंदुरूस्त अशा सत्तर (७०) वर्षे वयाच्या पुढील मल्लांसाठी याच दिवशी आगळी-वेगळी कुस्ती स्पर्धा होईल.
१६ ते २५ वयोगटातील विजेत्यास ‘कुमार वारकरी कुस्ती महावीर’ पुरस्कार, ५६ ते ६५ वयोगटातील विजेत्यास ‘वारकरी कुस्ती महावीर’ पुरस्कार आणि ७० वर्षांच्या पुढील विजेत्यास ‘ज्येष्ठ वारकरी कुस्ती महावीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. विजेत्या कुस्ती महावीरांचा सन्मान – मानाचा फेटा, माऊलींची/जगद्गुरुंची प्रतिमा, शाल, स्मृतिचिन्ह, सुवर्ण/रौप्य/कांस्य पदक व रोख रकमेची बक्षिसे देऊन गौरव करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील लोककलेला संजीवनी मिळावी म्हणून याच दिवशी रात्री ८.०० ते ११.०० वाजेपर्यंत, वारकर्‍यांना अत्यंत प्रिय असलेल्या शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचे प्रसिध्द असलेले नाथांचे भारूड व गवळणी यांच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here