लोकसंवाद २०२६* *महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा २४ तास सतर्क-अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे

*आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ ‘११२’ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन*

पंढरपूर :-
महिला, युवती आणि मुलींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पोलीस प्रशासनाने सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट केली आहे. कोणत्याही आपत्कालीन किंवा संकटाच्या प्रसंगी महिलांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी ‘११२’ हा एकत्रित आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक २४ तास कार्यरत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने महिलांनी कोणतीही भीती न बाळगता या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी केले. शासकीय योजनांची जनजागृती करण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने गणेश मंडळांच्या माध्यमातून ‘लोकसंवाद-२०२६’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील श्रीकृष्ण गणेश तरुण मंडळ येथे आयोजित कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी महिला सुरक्षेसाठी शासन व पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. महिलांवरील छेडछाड, अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार किंवा प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही धोकादायक परिस्थितीत ‘११२’ क्रमांकावर संपर्क साधल्यास पोलीस नियंत्रण कक्षामार्फत तातडीने मदतकार्य सुरू केले जाते. जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचे लोकेशन निश्चित करून आवश्यकतेनुसार पोलीस गस्ती पथक किंवा स्थानिक पोलीस घटनास्थळी मदतीसाठी पोहोचतात. महिला सुरक्षेसाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून, महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग, महिला सहाय्यता कक्ष, महिला सुरक्षा समिती, विशेष समुपदेशन केंद्र, हेल्पलाइन, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५ तसेच तक्रार निवारण समिती आदी यंत्रणांचा त्यामध्ये समावेश आहे. संकटाच्या प्रसंगी महिलांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे तसेच पोलीस प्रशासनाची मदत कशी घ्यावी, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. गणेश मंडळांनी गणेश विसर्जनाच्या वेळी पारंपरिक वाद्यांचाच वापर करावा. डॉल्बी व लेझर सिस्टीमवर अनावश्यक खर्च करण्याऐवजी मंडळांनी गावाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चास मदत करावी, वृक्षारोपणासह विविध सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहनही अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी केले. प्रारंभी पंढरपूर उप माहिती कार्यालयाचे अविनाश गरगडे यांनी लोकसंवाद 2026 उपक्रमाची माहिती व उद्देश सांगितला. या कार्यक्रमास कासेगाव ग्रामस्थ विशेषत: महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here