श्री क्षेत्र पंढरपूर येथे १२ ऑक्टोबरपासून रुक्मिणी नवरात्री संगीत महोत्सवाला प्रारंभ

*शास्त्रीय गायन, अभंगवाणी, व्याख्यान आणि भरतनाट्यमची पर्वणी; १८ ऑक्टोबरपर्यंत विविध सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन*

पंढरपूर, दि. ११ : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री रुक्मिणी नवरात्री संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, सोमवार, दि. १२ ऑक्टोबरपासून या महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. दि. १२ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत श्री संत तुकाराम भवन येथे दोन सत्रांत विविध सांगीतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. सायंकाळी ५.३० ते ७ आणि रात्री ७.३० ते १० या वेळेत होणाऱ्या या महोत्सवात नामवंत शास्त्रीय गायक, अभंगगायक, युवा कलाकार तसेच नृत्यकलाकार आपली कला विठुरायाच्या चरणी समर्पित करणार आहेत. मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर व सर्व सन्माननीय सदस्य, कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव आणि व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कृष्णा लवेकर यांचे शास्त्रीय गायन व अभंग आणि ज्योती शाम गोराने यांची अभंगवाणी सादर होणार आहे. मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी देवश्री दंडवते यांचे गायन आणि ‘आयडिया सारेगमप’ विजेती ज्ञानेश्वरी गाडगे यांचा ‘स्वर ज्ञानेश्वरी’ हा कार्यक्रम होईल. बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी प्रा. मधुकर पाटील यांचे ‘संत साहित्याची परंपरा आणि वारकरी संप्रदाय’ या विषयावर व्याख्यान, तसेच पं. कुमार गंधर्व यांचे नातू व शिष्य पं. भुवनेश कोमकली यांचे शास्त्रीय गायन आणि सगुण-निर्गुण अभंग सादर होतील. गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी रोहित पुजारी यांचे गायन आणि चैतन्य देवढे (माऊली, आळंदी) यांचा ‘स्वर चैतन्य’ कार्यक्रम होईल. शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी चैतन्य देशपांडे यांची अभंगवाणी आणि पं. शौनक अभिषेकी यांचे शास्त्रीय गायन व अभंगांचा ‘स्वराभिषेक’ अनुभवता येईल.
शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी पं. राम विधाते व पं. बजरंग विधाते यांची अभंगवाणी, तर पं. शंकर विधाते यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता ‘नवरस नृत्यांजली’ या भरतनाट्यम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, रात्री ७.३० वाजता लक्ष्मी बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शक्ती जागर’ या भरतनाट्यम सादरीकरणाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने शास्त्रीय संगीत, अभंगवाणी आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करण्यासाठी हा संगीत महोत्सव सातत्याने आयोजित केला जातो. या उपक्रमामुळे नामवंत कलाकारांसोबतच विविध कलाप्रकारांना व्यासपीठ उपलब्ध होत असून, पंढरपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर पडत आहे. या महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा पंढरपूर व पंचक्रोशीतील कलारसिक आणि संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here