बाजीराव विहीर येथे पार पडले गोल आणि उभे रिंगण.
July 04, 2025
बाजीराव विहीर येथे पार पडले उभे आणि गोल रिंगण
लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा
पंढरपूर(दि.०४)
:-आषाढी यात्रेकरीता पंढरपूच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गोल व तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण शुक्रवारी बाजीराव विहिरीच्या जवळ रंगले. आनंदाने वारकरी विठू नामाच्या जयघोषात नृत्यमध्ये तल्लीन झाले होते. बाजीराव विहीर परिसरात रिंगणाचा सोहळा वारकर्यांनी अनुभवला. रिंगण सोहळ्याचा आनंद महामार्गाच्या उड्डाणपुलावरुन भाविकांना घेता आला. या भव्यदिव्य रिंगण सोहळ्यामुळे शेकडो किलोमीटर अंतर पायी आलेल्या वारकर्यांचा शीण गेला.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी राज्यासह, देशाच्या विविध भागातून निघालेल्या संतांच्या पालख्या शुक्रवारी वाखरीत दाखल झाल्या.
तत्पुर्वी, दुपारी 1 वाजता भंडीशेगाव येथून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवला. त्यापूर्वी संत सोपान काका यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे निघाला. त्यानंतर पिराची कुरोली येथून जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा निघाला होता. पालखी सोहळ्यातील वारकर्यांनी संतांच्या पालख्यांचे दर्शन घेत आपापल्या सोहळ्यात सहभाग घेतला.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उभे रिंगणसाठी बाजीराव विहीर समोर आला. उडाणपूलाच्या शेजारील सर्व्हिस रस्त्यालगत लागलेले रिंगण पाहण्यासाठी वारकर्यांनी उड्डाणपुलावर गर्दी केली होती. दुपारी ४.०० वाजता उभे रिंगण पूर्ण झाले. त्यापूर्वी मैदानावर वारकर्यांनी फुगड्या, सुरपाट्यांच्या खेळासह, भारुडांचे कार्यक्रम सुरु केले होते. रिंगण पाहण्यासाठी वाखरीच्या पालखी तळावर दाखल झालेल्या विविध संतांच्या दिंडी सोहळ्यातील हजारो वारकरी बाजीराव विहीर परिसरात दाखल झाले होते.
तर सायंकाळी ५.०० वाजता संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा रिंगण स्थळी आला. यानंतर सेवेकर्यांनी टाळमृदंगाचा तालावर खांद्यावरून पालखी नाचवत रिंगण पाहण्यासाठी थांबलेल्या वारकर्यांच्या भोवतीने गोल रिंगण घातले. त्यानंतर मानाच्या दिंड्यांनी झेंडा घेऊन रिंगणात प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर अश्वस्वार रिंगणाला सुरवात झाली. अश्वांनी तीन फेर्या पुर्ण करत रिंगण पुर्ण केले. रिंगण पुर्ण होताच अश्वांच्या टापाची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली.
*पालखी सोहळा वाखरी मुक्कामी विसावला-*
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळयातील सोलापूर जिल्ह्यातील दुसरे उभे रिंगण तर चौथे गोल रिंगण बाजीराव विहीर येथे पार पडले. यानंतर सायंकाळी पालखी सोहळा पंढरपूरच्या वेशीवर असलेल्या वाखरी पालखी तळ येथे विसावला. शनिवारी वाखरी येथून दुपारी पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पंढरपूरच्या वेशीवर पालखी सोहळे आल्याने भाविक पांडुरंगाचा जयघोष करीत आहेत.