पंढरपूर प्रतिनिधी-
वाखरी (ता. पंढरपूर) येथे पांडुरंग परिवाराच्या वतीने कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचे पाचवे पुण्यस्मरण श्रद्धाभावाने व विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरे करण्यात आले. दिवसभर धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांमधून सुधाकरपंतांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
सकाळी भव्य रक्तदान शिबिराने पुण्यस्मरण कार्यक्रमाची सुरुवात झाली. यामध्ये शेतकरी,कामगार व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यात तब्बल २६७ जणांनी रक्तदान करून सुधाकरपंतांच्या समाजसेवेच्या परंपरेला सलाम अर्पण केला.
यानंतर ह.भ.प. जयवंत बोधले महाराज यांनी कीर्तनातून सुधाकरपंतांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांच्या समाजप्रेम, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि कर्मयोगी वृत्तीचे प्रभावी वर्णन करून उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला.
दुपारी पांडुरंग परिवाराने पुष्पांजली अर्पण करून सुधाकरपंतांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. दिवसभर परिसरातील नागरिक, शेतकरी विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सुधाकरपंतांना अभिवादन केले. श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या प्रत्येकाच्या मनात त्यांच्या कार्याबद्दल अपार आदर दिसून आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग चे चेअरमन प्रशांत परिचारक, युटोपियन शुगरचे उमेश परिचारक, व्हा. चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व संचालक मंडळ,अधिकारी यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, मार्केट कमिटीचे चेअरमन हरीश दादा गायकवाड, व्हाईस चेअरमन राजू बापू गावडे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती सदस्य जळगावकर, पंचायत समिती सभापती जयश्री व्हरगर, संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, धनश्री परिवार प्रमुख शिवाजीराव काळुंखे, बी.पी. रोंगे, पंढरपूर-मंगळवेढ्यातील मान्यवर, पांडुरंग कारखान्याचे संचालक, मार्केट कमिटीचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकेचे सदस्य, ज्येष्ठ संचालक दिनकरराव मोरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी, धार्मिक श्रद्धा आणि कार्यपरंपरेचा संगम घडवून हा पुण्यस्मरण सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.