मुंबई दि.14:- राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व देवस्थानांना केले होते.
या आवाहनास प्रतिसाद देत तसेच सामाजिक उत्तरदायित्व व मानवतावादी भूमिकेतून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने शासनाची मंजुरी घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपयाच्या मदतीचा धनादेश दिनांक 14 ऑक्टोबर रोजी मंत्रालय येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जमा केल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अभिजीत पाटील, मंदिर समितीच्या सदस्य शकुंतलाताई नडगिरे, संभाजी शिंदे, ॲड माधवीताई निगडे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, अतुल शास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार उपस्थित होते.