दिनांक- २२ ते २४ जून -दरम्यान -श्री -विठ्ठल -रुक्मिणी- मातेच्या- मूर्तीचे -संवर्धन- साठी- मंदिर- बंद

सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती.

दिनांक २३ व २४ जून रोजी मंदिर दर्शनासाठी राहणार बंद

पंढरपूर, दि. १२ : श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI), राज्य पुरातत्त्व विभाग तसेच मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकत्याच दि.11 जून रोजी एस कार्तिकेयन, जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध तज्ज्ञ, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, स्थानिक महाराज मंडळी, मंदिर समितीचे पदाधिकारी, सल्लागार परिषद सदस्य आणि संबंधित अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली होती. प्राप्त तांत्रिक मार्गदर्शन आणि शिफारशींच्या आधारे दिनांक २२ ते २४ जून या कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे संवर्धनाचे काम करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

या संवर्धनाच्या कामासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरक्षितपणे पूर्ण करता यावी तसेच मूर्तीच्या पावित्र्याचे आणि सुरक्षेचे रक्षण करता यावे यासाठी दिनांक २३ व २४ जून या दोन दिवसांमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती ही वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचे केंद्रस्थान असून, पुरातत्त्व विभाग व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत काळजीपूर्वक संवर्धनाचे कार्य केले जाणार आहे. यापूर्वी सन १९८८, २००५, २०१२ आणि २०२० या कालावधीत मूर्तीचे संवर्धन करण्यात आले होते. मागील संवर्धनास सुमारे पाच वर्षांचा कालावधी झाल्याने मूर्तीच्या काही भागांमध्ये नैसर्गिक झीज दिसून येत आहे. त्यानुषंगाने मूर्तीतील सूक्ष्म छिद्रे व झिजलेल्या भागांची दुरुस्ती तसेच मूर्तीचे आयुष्यमान वाढविण्यासाठी संरक्षक आवरण (Protective Coating) देण्यात येणार आहे. सदरची संपूर्ण प्रक्रिया भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगर व राज्य पुरातत्त्व विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. याकामी दिनांक २३ व २४ जून रोजी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याची वारकरी, भाविक व नागरिकांनी नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here