श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास सुमारे ५६.५९ लाख रुपयांच्या सोने पादुकांचे दान

पंढरपूर (ता. १६) :–
आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक दाखल होत असून मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या कालावधीत मंदिर समितीकडे रोख देणगीबरोबरच सोने, चांदी व इतर मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपातही मोठ्या प्रमाणात दान प्राप्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर एका दानशूर भाविकाने आपले नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सोने पादुका दान स्वरूपात अर्पण केल्या आहेत. या पादुकांचे वजन ४४६ ग्रॅम असून त्यांची अंदाजे किंमत रु. ५६,५९,००० इतकी होत आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सोने, चांदी वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र दान कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कक्षामध्ये दानस्वरूपात प्राप्त होणाऱ्या मौल्यवान वस्तूंची तपासणी, शुद्धता पडताळणी, वजन, नोंदणी व सुरक्षित स्वीकार करण्यासाठी दोन सराफ तसेच अनुभवी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे सोने, चांदीच्या मौल्यवान वस्तू दान करावयाच्या आहेत, त्यांनी मंदिर समितीच्या कार्यालयात संपर्क साधून अधिकृत पावतीसह दान करावे, असे आवाहन मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी केले आहे. यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतलाताई नडगिरे, संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रविणकुमार घम तसेच लेखाधिकारी मुकेश अनेचा उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here