विष्णूपद उत्सव 2024 : दर्शनासाठी भाविकांची गर्दी,
पंढरपूर:-
( मार्गशिर्ष शुध्द 01 ते मार्गशिर्ष वद्य 30 या कालावधीत श्री विठ्ठलाचे वास्तव्य विष्णूपदावर असते, अशी धारणा आहे. त्यामुळे महिनाभर विष्णूपद येथे दर्शनास भाविकांची गर्दी असते. यावर्षी दिनांक 02 ते 30 डिसेंबर 2024 दरम्यान विष्णूपद उत्सव संपन्न होत असून, या उत्सवास दिनांक 02 डिसेंबर पासून सुरवात झाली आहे. विष्णुपद मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आज दिनांक 24 डिसेंबर रोजी मंदिर समिती मार्फत दुपारी बारा ते तीन या वेळेत वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सुमारे 2500 ते 3000 भाविकांनी वनभोजनाचा लाभ घेतल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
गोपाळपूर रोडवरील विष्णूपद मंदिर येथे मंदिर समिती मार्फत भाविकांना पुरेसा सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने चांगली स्वच्छता व्यवस्था, पिण्याचे पाणी, दर्शन रांग व्यवस्थापनासाठी बॅरीकेटिंग व सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विष्णुपद मंदिर येथे वनभोजनाची प्रथा असल्याने प्रती वर्षाप्रमाणे मंदिर समिती मार्फत वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या वनभोजनाचे नियोजन, विभाग प्रमुख बलभीम पावले व राजेश पिटले यांना देण्यात आले होते. मंदिर समिती मार्फत देण्यात येणाऱ्या सोई सुविधा बाबत भाविकांनी समाधान व्यक्त केल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी दिली.