*बीडचे पार्सल परत पाठवा..* *अमित देशमुख अन् सतेज पाटलांनी घेतला राम सातपुते यांचा खरपूस समाचार*

प्रतिनिधी

बीडचे पार्सल सोलापूरच्या पत्त्यावर आले आहे. त्यामुळे सोलापूरकरांनी आता त्याला विचारले पाहिजे, मेरे अंगने तुम्हारा क्या काम है, येथे याचा रहिवाशी पत्ता नाही, आपला पत्ता चुकलेला आहे आणि हे पार्सल सोलापूर मध्ये कोणीही स्वीकारायला तयार नाही. त्यामुळे याला परत पाठवण्यात यावे हा निर्णय तुमच्यापैकी प्रत्येकाने घेतलेला आहे, अशा अशा शब्दात माजी मंत्री अमित देशमुख यांनी राम सातपुते यांचे नाव न घेता समाचार घेतला. मोहोळ तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अमित देशमुख बोलत होते.

*सोलापूरची लेक बलाढ्य शक्तीविरोधात लढत आहे*

आपली लेक, सोलापूरची लेक बलाढ्य शक्तीविरोधात लढत आहे. तुमच्या हक्कासाठी न्यायासाठी प्रश्नासाठी प्रणिती शिंदे लढत आहेत आणि मला विश्वास आहे तुमच्या आशीर्वादाने प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून जातील आणि भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये सामान्य माणसांचे प्रश्न मांडतील प्रश्न सोडवण्यासाठी त्या झगडतील. तसेच सोलापूरला न्याय मिळवून देण्यासाठी प्रणिती शिंदे कमी पडणार नाहीत, असा विश्वास यावेळी आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

*राज्यात फोडाफोडीतून आलेले सरकार*

राज्यात फोडाफोडीतून सरकार आले असून गाईच्या दुधाला अनुदान जाहीर करण्यात आले. मात्र, अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही. अनुदानासाठी मोठ्या प्रमाणात अटी घातल्याने पाच रुपये येता येता पन्नास रुपये खर्च होतो. दरम्यान, भाजप सरकार हे फसवे सरकार असून या सरकारने फक्त घोषणा केल्या आहेत. या सरकारने काही केले नसल्याची टीका आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केली आहे. दहा वर्षात तुमचे खासदार तुम्हाला भेटले नाहीत. आता तुमच्यापुढे तुमची लेक आहे. तिला खासदार म्हणून दिल्लीत पाठवण्याची जबाबदारी येत्या 7 मे रोजी पार पाडायची असल्याचेही पाटील यावेळी म्हणाले.

*मराठा आरक्षणासाठी तलवार उपसाण्याची हीच वेळ*

दरम्यान, मराठा आरक्षणाला विरोध कोणाचा आहे हे आता लोकांना समजले आहे. आरक्षणाला नेमके कोण विरोध करतेय त्यांची नावे पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की ही लोकं कोणाशी संबधित आहेत. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मतदानाच्या माध्यमातून तलवार उपसण्याची हीच वेळ असून एकदा वेळ गेल्यास पुन्हा तलवार उपसण्याची संधी मिळणार नसल्याचेही सतेज पाटील यावेळी म्हणाले. दरम्यान, गरीब महिलांना महिन्याला साडेआठ हजार रुपये काँग्रेसची सत्ता आल्यावर अकाउंटमध्ये डायरेक्ट मिळणार असल्याचे यावेळी सतेज पाटील यांनी सांगितले आहे.

*दोन्ही खासदारांनी सोलापूरचे वाटोळे केले – आमदार प्रणिती शिंदे*

गेल्या दहा वर्षात भाजपच्या दोन्ही खासदारांनी सोलापूरचे वाटोळे केले. पंधरा लाखांचे खोटे अमिष भाजपने दिले हे समजायला दहा वर्षे लागले. ज्यांच्या जीवावर सत्तेत आले. आज त्याच लोकांकडे भाजपने पाठ फिरवली आहे. शेतकरी अडचणीत असताना सरकार मायबाप कुठे आहे. सरकार फक्त आदानी, अंबानीचे मायबाप आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे मायबाप नाही, अशी टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले आहे

यावेळी पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, दुष्काळात तेरावा महिना असून मोहोळच्या अनेक गावात टँकर आहेत. टॅंकर अभावी काही ठिकाणी फक्त पाच-पाच दिवसांचे पाणी आहे. जीएसटीचा राक्षस तुमच्या उरावर बसला आहे. खताचे पोते देखील या लोकांनी सोडले नाही. खतांवरसुद्धा 18 टक्के जीएसटी लावण्यात आली आहे. एक लाख रुपयांचे खत घेतले तर अठरा हजार रुपये जीएसटी भरावी लागते. जीएसटीपासून या लोकांनी काहीही सोडले नसल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी काँगेस जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुलेमन तांबोळी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मंगेश पांढरे, काँग्रेस तालुका सरचिटणीस अजित जगताप, पवन गायकवाड, सीमा पाटील, राजेश पवार, शाहीन शेख, दाजी डोंगरे, किशोर पवार, बाळासाहेब पाटील, शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख अशोक भोसले, दीपक मेंबर गायकवाड, सुभाष पाटील, पवनकुमार गायकवाड, सुरेश शिवपूजे, विनय पाटील, विक्रम दळवी, ठाकरे गट युवासेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख, दादासाहेब साठे, सुनीता भोसले, उल्हास पवार, संगीता पवार, विजय पवार, विठोबा पुजारी, सिध्देश्वर माने यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here