मंदिर समितीच्या वतीने नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी -मनोज श्रोत्री

पंढरपूर (ता.02) :-
प्रतिवर्षीप्रमाणे दि. 03 ते 18 ऑक्टोंबर या कालावधीत नवरात्र उत्सव संपन्न होत असून, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवतांच्या मंदिरात आवश्यक ते नियोजन करून तसेच सर्व प्रथा व परंपरांचे पालन करुन
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवाची तयारी केली असून, त्या अनुषंगाने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील स्वच्छता, दर्शनरांग सुलभ व द्रुतगतीने चालविण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती व इतर आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सव कालावधीत सभामंडप येथे भजन, किर्तन, गोंधळ, पंचसुक्त पवमान अभिषेक, रूक्मिणी स्वयंवर कथा, रूक्मिणी स्वंयंवर सामुदायिक ग्रंथ पारायण व महिला भजनी मंडळाची भजने संपन्न होणार असल्याचे व्यवस्थापक श्री श्रोत्री यांनी सांगीतले.

त्याचबरोबर अंबाबाई मंदिर, यमाई तुकाई मंदिर, रेणूकादेवी मंदिर, लखुबाई मंदिर, यल्लमादेवी मंदिर, पद्यमावती मंदिर इत्यादी परिवार देवतांच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. या मंदिरांच्या ठिकाणी ऊन, वारा व पाऊसापासून संरक्षणासाठी कापडी मंडप, बॅरीकेटींग, स्वच्छता , पिण्याचे पाणी व सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्र कालावधीत रूक्मिणीमातेस पारंपारीक पध्दतीचे विविध पोषाख करून अलंकार परिधान करण्यात येतात. सदरचे अलंकार पुरातन व दुर्मिळ असल्याने सुरक्षतेच्या दृष्टीने सर्व अलंकार नव्याने गाठविण्यात आलेले आहेत. तसेच संत तुकाराम भवन येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, सदरचा उत्सव पार पाडण्यासाठी मंदिर समितीचे सर्व खातेप्रमुख व अधिनस्त कर्मचारी परिश्रम घेत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here