पंढरपूर :-
कार्तिकी शुध्द एकादशी सोहळा दि. 02 नोव्हेंबर 2025 रोजी असून, या वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक येतात. या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाला आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने व मंदीर समितीने केलेल्या सोयी-सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली .
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दर्शन रांगेत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची संख्या वाढवणे तसेच त्यासाठी जादा स्वच्छता कर्मचारी उपलब्धता ठेवावी. नगरपालिका प्रशासनाने चंद्रभागा वाळवंट कायम स्वच्छ राहील याची दक्षता घेऊन नदीपात्रातील खड्डे बुजवावेत तसेच वाळवंट स्वच्छतेसाठी स्वतंत्र स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पथक नेमावेत. नदीपात्रात हायमास्ट दिव्यांसाठी जोडण्यात आलेली वीज जोडणी सुरक्षित ठेवण्यासाठी तात्काळ स्थलांतर करावे. शहरातील तसेच प्रदक्षिणा मार्गावरील अतिक्रमणे तात्काळ काढावीत, अनाधिकृत होर्डिंगवर कारवाई करावी अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.
तसेच भक्तीसागर(65 एकर), चंद्रभागा वाळवंट येथे वारकरी भाविकांसाठी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये शौचालय, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था याबाबत माहिती घेतली त्याचबरोबर मंदिर समितीकडून पत्रा शेड, दर्शन रांगेत, करण्यात आलेल्या सुविधांची पाहणी केली
यावेळी त्यांच्या समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढगळे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक दीपक धोत्रे, लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्यासह संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदीर समितीकडून वारकरी-भाविकांना देण्यात आलेल्या सुविधांची व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीराचे जतन संवर्धन आराखड्यातंर्गत सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. तसेच मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी नगरपालिका प्रशासनाकडून 65 एकर, वाळवंट व शहरात आरोग्याच्या दृष्टीने उपलब्ध सुविधा, अतिक्रमण मोहिम, शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाश व्यवस्था आदीबाबत माहिती दिली.



















