अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या श्री.क्षेत्र पंढरपूर येथे दि.10/07/2022 रोजी आषाढी यात्रा भरत असुन येणा-या लाखो भाविक वारक-यांना सुविधा पुरविण्याकामी पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज झालेली आहे.
यात्रेकरुंना यात्रा कालावधीमध्ये खालीलप्रमाणे सुविधा देण्यात येणार आहेत. नगरपरिषदेने प्रदक्षिणा रस्त्याचे व शहरातील रस्ता दुरुस्तीची कामे यापुर्वी करण्यात आलेली आहेत. तसेच अर्बन बँक ते नाथ चौक, सावरकर पुतळा ते महाद्वार, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, अंबाबाई पटांगण, चंद्रभागा वाळवंट येथील अतिक्रमण काढण्यात आले असुन यात्रा कालावधीमध्ये भाविकांना रस्त्यावर चालताना अडचणी येवु नयेत म्हणुन ही अतिक्रमण पथक यात्रा कालावधी संपेपर्यंत कार्यरत राहणार आहे. तसेच वाळवंटात येणा-या यात्रेकरुंसाठी जुvना पुल ते पुंडलिक मंदीर व या मुख्य रस्त्याला लागुन नदीपर्यंत उपरस्त्याची आखणी करण्यात आली आहे. यात्रा कालाधीमध्ये संपुर्ण यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर हद्दीत 5 ठिकाणी 65 एकर, वाखरी पालखी तळ, दर्शन मंडप, नदी पात्र, दर्शन बारी पत्रा शेड, पंढरपूर नगपरिषद इमारत या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे. तसेच राज्य महिला आयोग यांच्या निर्देशानुसार प्रत्येक EOC केंद्रावर मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात येत आहे. तसेच शहरातील हॉटेल, लॉज, मठ धारक यांना आग प्रतिबंधक यंत्रणा सुस्थितीत ठेवणेबाबत नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. तसेच शहरातील 130 धोकादायक असलेल्या इमारतीच्या मालकांना नोटीसा बजावण्यात आल्या असुन, धोकादायक असलेल्या इमारतींवर नगरपरिषदेने ही इमारत धोकादायक असुन राहण्यास योग्य नाही असा फलकही लावण्यात आलेला आहे. तरी नागरीकांनी अशा धोकादायक इमारतींमध्ये राहु नये असे आवाहन नगरपरिषदेच्यावतीने करण्यात येत आहे.
तसेच वाखरी पालखी तळ येथे 4 हायमास्टवर 32 एलईडी फ्लंड लाईट व 160 पोलवर एलईडी दिवे व पुंडलिक मंदीर ते दगडी पुलापर्यंत 9 हायमास्ट दिवे, प्रत्येक घाटासमोर असलेल्या लोखंडी पोलवर असे एकुण 30 एलईडी हायमास्ट दिवे लावण्यात आले असुन सदर दिव्यांचा प्रकाश संपुर्ण वाळवंटात पडणार आहे. त्याचप्रमाणे यात्रेकरुंच्या सोईसाठी संपुर्ण दर्शनबारी मार्ग 12 एलईडी, 65 एकर मध्ये 10 हायमास्ट, 24 एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. अनिल नगर येथील पाण्याच्या टाकीवरुन स्वतंत्र पाईप लाईन द्वारे यात्रेकरुंना पिण्याचे पाणी मिळावे या हेतुन नदीच्या वाळवंटामध्ये 54 नळ बसविण्यात आले आहेत. तसेच यात्रेपुर्वी संपुर्ण वाळवंट चारवेळा विशेष स्वच्छता मोहिमेद्वारे स्वच्छ करण्यात आले आहे. तसेच भाविकांनी उघड्यावर शौचास बसु नये म्हणुन विशेष टीम नेमण्यात आली आहे. नदी पात्र, पत्राशेड दर्शनबारी, 65 एकर, मंदिर परिसर दक्षिण बाजु, शासकीय विश्रामधाम व अग्निशमन केंद्र येथे आगीची दुर्घटना होवु नये म्हणुन 24 तास अग्निशमन वाहन उभे करण्यात आलेले आहे. पत्रा शेड, नविन अग्निशमन केंद्र, चंद्रभागा नदी वाळवंट तसेच मंदीरा भोवती आग लागल्यास अग्निशामकाला त्वरीत पाणी उपलब्ध व्हावे म्हणुन मंदीराच्या दक्षिण बाजुस फायर हायड्रेट उभा केला आहे. यात्रा कालावधीमध्ये शहर व मंदीर परिसरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गोपाळपुर नाका येथील पत्रा शेडमध्ये पिण्याचे पाणी नळ कनेक्शन द्वारे उपलब्ध करुन दिले आहे. या ठिकाणी आतील बाजुस शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात एकुण 65 हातपंप व मंदिर परिसर व प्रदक्षिणा मार्गावरील 60 विद्युत पंप उपलब्ध असुन याद्वारे यात्रेकरुंना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच यात्रा कालावधीत पिण्याचे पाणी किमान 10 टँकर द्वारे संपुर्ण शहरात विशेष: ज्या ठिकाणी मठांची संख्या जास्त आहे त्याठिकाणी पाणी पुरविण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत पुर्वी शहरामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली असुन यात्रा कालावधीमध्ये शहरात स्वच्छता रहावी म्हणुन नियोजन बद्ध कार्यक्रम आखण्यात आला होता. नगरपरिषदेच्यावतीने 1400 सफाई कर्मचा-यांद्वारे व उपनगरात स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच यात्रा कालावधीमध्ये शहर, वाळवंट, 65 एकर प्रत्येक मोठ्या मठांमध्ये स्वतंत्ररित्या कचरा साठविण्यासाठी लोखंडी बॅरेल ठेवण्यात यावे अशी सुचना मठाधीपतींना देण्यात आलेली आहे. तसेच 41 घंटागाडी द्वारे दोन वेळा कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत चालु राहणार आहे. शहरामध्ये कचरा त्वरीत उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील 8 वाहने, 7 टिपर, 2 कॉम्पॅक्टर, 2 डंपरप्लेसर, 2 डंपिंग ट्रॉलिने, 80 कचरा कंटेनर मार्फत दररोज 100 ते 150 टन कचरा उचलण्यात येणार आहे. नदीपात्रामध्ये खास महिलांसाठी विविध ठिकाणी नदी पात्रात 500, 65 एकर 200, पत्राशेड 50, व शहरातील विविध ठिकाणी 750 शौचालये तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आली आहेत.
तसेच मा.जिल्हाधिकारी सो. सोलापूर यांनी काढलेल्या आदेशानुसार आषाढी यात्रा कालावधीमध्ये स्वच्छता करण्यासाठी व जिल्ह्यातील नगरपरिषदेमधील व इतर शासकीय कर्मचारी यांची प्रतिनियुक्ती करण्यात आलेली आहे. या बाहेर गावाहुन आलेल्या कर्मचा-यांची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करुन जेवणाचीही व्यवस्था नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेली आहे. तसेच या यात्रा कालावधीमध्ये बाहेर गावावरुन अनेक आधार नसलेले निराश्रीत बेघर पंढरपूर शहरामध्ये येत असतात अशा निराधार लोकांसाठी दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानांतर्गत बेघरांसाठी निवारा केंद्राची स्थापना गोपाळपुर रोडवरील सीपीडब्लु येथे करण्यात आलेली आहे. सध्या येथे सुमारे 100 लोक या योजनेचा लाभ घेत आहेत.
बायोकल्चर तंत्राचा वापर करुन जैविक पद्धतीने नदीच्या पात्रात होणारी घाण दुर्गंधीयुक्त वास कचरा व घाण कुजविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे. शौचालय नियोजनामध्ये तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत व सुलभ शौचालयाची 29 ठिकाणी 2054 सीट्स, नगरपरिषदेची कायमची 25 ठिकाणी 176 सीट्स, 65 एकर परिसरातील कायम स्वरुपी 12 ठिकाणी 1864 सीट्स शौचालयाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच यात्रा कालावधीत भाविकांना मोकाट जनावरांचा त्रास होवु नये याकरिता मोकाट जनावरे पकडण्याची विशेष मोहिम राबवुन आतापर्यंत 50 ते 60 जनावरे पकडुन त्यांना शहराबाहेर सोडण्यात आले आहे.
शहरात यात्रा कालावधीमध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने पत्राशेड दर्शनबारी, पोलीस संकुल, दर्शन मंडप, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट या 5 ठिकाणी यात्रेकरुंच्या सोईसाठी प्रथमोपचार केंद्र उघडण्यात आले आहेत. तसेच यात्रा कालाधीत कॉलरा हॉस्पिटल येथे 50 कॉटचे हंगामी स्वरुपाचे रुग्णालय स्थापित करण्यात आले आहे. यात्रा व्यवस्थित पार पडावी म्हणुन मा.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय अधिकारी तथा पंढरपूर नगरपरिषदेचे प्रशासक गजानन गुरव, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर, नगर अभियंता नेताजी पवार, पाणीपुरवठा अभियंता आत्माराम जाधव, हिवताप अधिकारी किरण मंजुळ, विद्युत अभियंता राजकुमार सपाटे रोडलाईट इन्स्पेक्टर संतोष क्षिरसागर, संतोष कसबे, योगेश काळे व सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. तसेच यात्रा कालावधीमध्ये शहरातील सर्व स्थानिक नागरीकांनी स्वच्छता व आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी सहकार्य करावे असे अवाहन करण्यात येत आहे.