*सोलापूर उद्योजक असोसिएशनकडून प्रणिती शिंदे यांना विजयासाठी शुभेच्छा*

प्रतिनिधी:-
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना सोलापूर इंडस्ट्रियल असोसिएशनने विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी प्रणिती शिंदे यांनी वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना मांडत लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून लढा देण्याचे आवाहन केले.

रविवारी सोलापूर उद्योजकता असोसिएशनच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी देखील उपस्थित लावली होती. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राम रेड्डी, उपाध्यक्ष गणेश सुत्रावे, माजी अध्यक्ष शरदकृष्ण ठाकरे, सचिव वासुदेव बंग, संजीव पाटील आदी पदाधिकारी आणि उद्योजक उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी असोसिएशनच्या वतीने काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच प्रणिती शिंदे या बहुमताने निवडून येतील,असा विश्वासही यावेळी असोसिएशनकडून व्यक्त करण्यात आला.

प्रणिती शिंदे एक तरुण मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. त्या कोणत्याही पक्षात राहिल्या तरी त्या पक्षासाठी त्या एक महत्त्वाचे नेते ठरतील असे गौरव उद्गार देखील यावेळी श्री रेड्डी यांनी व्यक्त केले.

दरम्यान, यावेळी असोसिएशनच्या वतीने उद्योजकांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रणिती शिंदे यांना पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यापूर्वी देखील उद्योजकांचे प्रश्न हाताळले आहेत आणि ते सोडवले आहेत. यापुढे देखील उद्योजकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन देखील यावेळी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले.

शेतकरी आणि उद्योजक हे दोनच घटक देशाच्या संपत्तीमध्ये भर घालतात. मात्र सद्यस्थितीत उद्योजकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोणत्याही गोष्टीसाठी उद्योजकांना पैसे मोजावे लागतात परवानगी वेळेवर मिळत नाही या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून सुसूत्रता आणणे गरजेचे असल्याचे मतही उद्योजक आणि व्यक्त केले.

यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की देशात अशी एक विचारसरणी निर्माण झाली आहे, ती समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. संविधानाला धक्का पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोलापूरमध्ये देखील अशाप्रकारे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. मात्र आपण कामाला महत्त्व देतो. परंतु अशा विचारसरणीमुळे आपणही कुठे विचलित होत असो, तर आपण एकत्र कुटुंब म्हणून राहण्यासाठी वसुधैव कुटुंबकम प्रयत्न करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे मत प्रणिती शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here