पंढरपूर (प्रतिनिधी)
विठ्ठल कारखान्याच्या निवडणूक निकालाविषयी आम्हाला कसलीही काळजी नाही, ही निवडणूक आम्ही सभासदांवर सोपवली आहे. विठ्ठल कारखाना वाचवायचा की डुबवायचा, हे आता सभासदचं ठरवणार आहेत;
असे मत ॲड. दीपक पवार यांनी व्यक्त केले. ते रोपळे येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी युवराज पाटील, गणेश पाटील, आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
विठ्ठल कारखान्याची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहे. दोन दिवसात प्रचार थंडावणार आहे.विठ्ठल कारखान्याची दशा कुणी आणि कशी केली ? यावर युवराज पाटील गटाने प्रकाशझोत टाकला आहे. याचवेळी कारखान्याचे सभासद आणि कर्मचाऱ्यांना जोराचा फटका बसला आहे. सोन्याचा धूर निघणारा साखर कारखाना आता अंतिम घटका मोजत आहे. ही सर्व परिस्थिती सभासदांनाही माहित आहे.
युवराज पाटील यांच्यामुळेच कारखाना सहकारी राहिला आहे. मागील काही दिवसापूर्वीच या कारखान्याचा सौदा होणार होता, परंतु न्यायालयात जाऊन बँकेच्या जप्ती आदेशावर स्थगिती मिळवल्याने, या कारखान्याची आता निवडणूक होत आहे . या सर्व बाबींची सभासद मंडळींना पूर्णतः कल्पना आहे.
स्वर्गीय कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील यांच्या कार्याची उजळणी या काळात मोठ्याने झाली आहे. अशाच प्रकारचा कारभार करणारा कारभारी विठ्ठल कारखान्यास हवा, अशी सभासदांची भावना झाली आहे. कारखान्याच्या कारभाराविषयी बोलायचे सोडून इतर मुद्द्यावर बोलून सत्ताधारी मंडळी सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हेही सभासदांनी पुरते ओळखले आहे .यामुळे या निवडणुकीत छक्के पंजे अजिबात चालणार नाहीत , असा विश्वास ॲड. दीपक पवार यांनी बोलून दाखवला.
युवराज पाटील ,गणेश पाटील आणि ॲड.दीपक पवार यांनी, श्री विठ्ठल अण्णाभाऊ विकास पॅनल निवडणुकीत उतरवला आहे. सभासदांपुढे सर्व विषय मांडून झाले आहेत. विठ्ठलचे सभासदही सुज्ञ आहेत. आता विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या निकाल त्यांच्यावरच सोपवून, आम्ही रिकामे झालो आहोत ; अशी प्रतिक्रिया ॲड. दीपक पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
चौकट
*विठ्ठलचा फैसला सभासदांवर सोपवला*
श्री विठ्ठल आण्णाभाऊ शेतकरी विकास पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभा असलेल्या या पॅनलने विठ्ठलच्या सभासदांवर विश्वास टाकला आहे. विठ्ठल कारखान्याचा निकाल सभासदच ठरवणार आहेत, असे सांगून विठ्ठलच्या निकालाची आम्हाला कोणतीही काळजी नाही, हा निकाल सभासदांवर सोपवून आम्ही रिकामे झालो आहोत; अशी प्रतिक्रिया ॲड. दीपक पवार यांनी व्यक्त केली आहे.