*महाराष्ट्र धर्म जपण्याची हि निवडणूक* : खासदार अमोल कोल्हे
*४२ गावातील जनता मला कधीही परकं पाडणार नाही* :
अभिजीत पाटील
(अभिजीत पाटील यांच्या रूपाने शरद पवार साहेबांचा पट्ट्या आमदार होणार; खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला विश्वास)
पंढरपूर /प्रतिनिधी
माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांची जाहीर सभा करकंब येथे संपन्न झाली.
यावेळी यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, मा. जि.प.सदस्य भारत आबा शिंदे, संजय कोकाटे, संजय पाटील घाटणेकर, नितीन कापसे , शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष मधुकर देशमुख, काँग्रेसचे नितीन नागणे, ज्योती कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे, बाबूतात्या सुर्वे, विष्णू भाऊ बागल, सुधीर भोसले, विजय भगत, करकंबचे जेष्ठ दिलीप पुरवत बी.एस पाटील, अमोल शेळके, खरे गुरुजी यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि करकंब परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की लोकसभेला फटका बसल्यानंतर महायुती सरकारने मतांवर डोळा ठेवून अनेक योजना काढल्या. मात्र शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने राज्यात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. तर सत्ताधाऱ्यांकडून उद्योगपतींना कर्जमाफी दिली गेली. यामुळे सत्ताधाऱ्यांवर राज्यातील शेतकरी नाराज आहेत. सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने पक्ष फोडाफोडीचे राजकारण केले. यामुळे विधानसभेची निवडणूक हि महाराष्ट्र धर्म जपण्याची निवडणूक झाली आहे. लोकसभा निवडणुकीला येथील जनता दिल्लीच्या तक्तासमोर झुकली नाही. त्यांना धडा शिकवला. याही निवडणुकीला जनता महायुतीला चांगलाच धडा शिकवेल असा हल्लाबोल खासदार कोल्हे यांनी यावेळी महायुती सरकारवर केला.
ते पुढे बोलताना म्हणाले की शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करण्याचे काम केले. त्याच पद्धतीने अभिजीत पाटील यांनी सहकारातून मोठे काम केले आहे. अभिजीत पाटील हे आमदार झाल्यावर शरद पवार यांचे या मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार आहे. यामुळे शरद पवार यांचा पट्ट्या अभिजीत पाटील आमदार होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेसाठी महाविकास आघाडीने काढलेल्या जाहीरनाम्याचे थोडक्यात माहिती दिली.
यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की मतदार संघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र विरोधक मुद्द्यावर बोलत नाहीत. रस्त्याची दुरावस्था झाली आहे. करकंब येथे अनेक संतांच्या पालख्या मुक्कामी असतात मात्र कोणतीही सोय होत नाही. कोट्यावधी खर्च करूनही येथील नागरिकांना पिण्याचे पाणी देऊ शकले नाहीत, बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे. परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी नाही. करकंब नगरपंचायत न झाल्याने कोणताही निधी येत नाही. या मतदारसंघावर पवार साहेबांचे विशेष लक्ष आहे. यांना गड राखायला दिला तर ते मालक झाले अशा शब्दात शिंदे यांचा समाचार घेतला.
ते पुढे बोलताना म्हणाले की विठ्ठल कारखान्याच्या वेळेस दिलेला शब्द मी पाळला आहे. पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी मला एक वेळे संधी द्या. मी करकंब नगरपंचायत करेन, परिसरातील नागरिकांसाठी करकंबला अप्पर तहसील कार्यालय मंजूर करेन, भीमा नदीवर बंधाऱ्याची उंची वाढवून या भागातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा कायमचा प्रश्न मिटवणार, मुस्लिम दफनभूमीचा प्रश्न मार्गी लागेल, घरकुलाचा प्रश्न मार्गी लावेन, ४२ गावातील ही जनता मला पोरक पाडणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी त्यांनी कार्तिकी एकादशी निमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या.